संगणक अभियंत्या सरपंचाकडून गावच्या ॲपची निर्मिती

संगणक अभियंत्या सरपंचाकडून गावच्या ॲपची निर्मिती

कबनूर - डिजिटल इंडिया संकल्पना देशभरात सर्वत्र रुजू होत असताना कबनूर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीची व गावची माहिती घरबसल्या ग्रामस्थांना मिळावी. यासाठी नावीन्यपूर्ण ‘स्मार्ट ॲप’ तयार करून कबनूर स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवली जात आहे. या ॲपवर कबनूरमधील सर्व माहिती मोबाईलच्या एका क्‍लिकवर मिळणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांपासून ते नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ यांना होणार आहे.

संगणक अभियंते असलेले कबनूरचे सरपंच उदय गीते यांच्या संकल्पनेतून या ॲपची निर्मिती झाली आहे. यामुळे स्मार्ट मोबाईलवर माहिती उपलब्ध होणार आहे. दाखले क्‍लिकवर रहिवासी, घराचा उतारा, नाहरकत, व्यावसायिक, जन्म-मृत्यू, जन्म-मृत्यू नोंद, विवाह नोंदणी, तीन अपत्य नसलेला दाखला आदींसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची व फीची माहिती तसेच उत्सव साजरा करण्यासाठी नमुना अर्जाची नक्कल मिळणार आहे. 

आपत्कालीन क्‍लिकवर वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका संपर्क, पोलिस, अग्निशामन, वायरमन, टपाल कार्यालय, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, सर्पमित्र यांना संपर्क या गोष्टी असून एसएमएस पाठवता येणार आहे. ॲपवर ग्रामस्थांना वॉर्डातील तक्रारी नोंदवता येणार आहेत. टॅक्‍स भरणाअंतर्गत ग्रामस्थांना ऑनलाईन घरफाळा व पाणीपट्टी भरता येऊ शकते. तसेच ई-पेमेंट या अंतर्गत ७/१२ पोर्टल, राष्ट्रीय मतदाता पोर्टल, वीज बिल भरणे, एस.टी., रेल्वे व विमान तिकीट आरक्षित करणे, इन्कम टॅक्‍स भरणे, महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ, महाराष्ट्र पर्यटन अशा सर्व संकेतस्थळांचा एकाच ठिकाणी पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

शैक्षणिक क्‍लिकवर विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, शैक्षणिक शाखा, उपलब्ध प्रवेश, संपर्क व इतर माहिती मिळणार आहे. दाखले, चालू घडामोडी, शेतकऱ्यांना कृषी किंगच्या माध्यमातून तज्ज्ञांचा सल्ला, जोडधंदा करण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. 

याचे उद्‌घाटन व देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार अंत्यविधी आर्थिक साहाय्य योजना लोकार्पण सोहळा आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते व पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्‍मा सनदी, सरपंच उदय गीते, ग्रामविकास अधिकारी बी. टी. कुंभार आदी उपस्थित होते.   

‘आधुनिक युगात काळाची पावले ओळखून डिजिटल इंडिया ही संकल्पना वापरणे आवश्‍यक आहे. म्हणून ग्रामपंचायतीने हे ॲप तयार केले आहे. ग्रामस्थांनी या ॲपचा वापर करून गावाच्या विकासात सहभागी व्हावे.
- उदय गीते,
सरपंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com