गृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी

गृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी

माढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच काम दिले जाते. उर्वरीत दिवस कामाच्या शोधार्थ भटकंती करावी लागते. पोलिसांच्या खाद्यांला खांदा लावुन आठ तास काम करूनही तुटपुंज्या मानधन तत्वावर काम करावे लागत असल्याने बिन पगार फुल अधिकारी अशी परिस्थिती जिल्ह्यातील गृहरक्षक दल(होमगर्ड) यांची झाली आहे.

राज्यातील होमगार्डस हे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पोलिसांचे कामाचे तास व होमगार्डसच्या कामाचे तास समान असून दोघांच्या कामाचे स्वरूप देखील सारखेच आहे. असे असताना होमगार्डसना निष्काम सेवा या सुंदर नावाखाली अल्प वेतन देऊन शासन त्यांच्याकडुन काम करून घेत आहे. कुठलाही बंदोबस्त आला की, होमागर्डंना पाचारण केले जाते. त्यांना बंदोबस्त कधी येईल याची आधी थोडीशीही कल्पना नसते. त्यामुळे मोबाईलवर मेसेज आला की, कधीही, केव्हाही बॅग भरायची व हजर रहायाचे. कारण वर्षातुन दोन ते तीन महिनेच हे काम असते. यामुळे ते पार्टटाइम म्हणुन इतर व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. अधिकाऱ्यांना अनेक कामानिमित्त, घडलेल्या घटनांची माहिती देण्यासाठी मोबाईल, फोन लावावा लागतो. तो खर्चही होमगार्डला मिळत नाही. ऑनलाइन ड्यूटीमुळे जिल्ह्यात मिळेल त्याठिकाणी ड्यूटीला जावे लागते. सध्या शेतात कामाला जाणार्यां शेतमजुरांना देखील ३०० रूपये हजेरी मिळते. होमगार्डंना त्यामानाने होमगार्डंना रात्री अपरात्री कुठेही कधीही बंदोबस्त करून देखील अगदी तुटपुंजे मानधन दिले जाते. त्यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न तमाम होमगार्ड कर्मचार्यांच्या समोर उभा असतो ? 

अलिकडच्या काही वर्षांत "ऑनलाइन' ड्यूटीमुळे होमागार्डच्या बंदोबस्तात अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

पूर्वी होमगार्डचा बंदोबस्त जिल्हा स्तर व तालुकास्तरावरून लावला जात असे. यामुळे होमगार्ड ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाणी व ड्यूटीचे ठिकाण जवळ होते. आता मात्र मुंबईच्या होमगार्ड कार्यालयातून बंदोबस्त लावला जातो. यात कोणाचीही ड्यूटी अंतराचा (कमी जास्त अंतर) विचार न करता लावली जाते. मानधनाच्या तुलनेत ड्यूटी परवडत नसल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांच्या मदतीला वेळोवेळी असणार्यां होमगार्डच्या कुटूंबाचा तरी विचार शासनाने करून मानधन वाढवावे. अथवा कायमस्वरूपी मानधनासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

वेळेवर ना गणवेश ना पगार
- सरकारकडुन होमगार्ड भरती झाल्यावर मिळालेले गणवेश, बूट नंतर चार-चार वर्ष मिळत नाही. किमान तीन वर्षातुन एकदा गणवेश मिळावे असा शासनाचा नियम आहे. परंतु फक्त तो कागदोपत्रीच आहे. तसेच होमगार्डंना असलेले मानधन वेळेवर मिळत नसल्याने कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडते. त्यामुळे किमान वेळेवर मानधन तरी द्यावे अशीही मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com