esakal | जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी भरतीवेळी गोंधळ

बोलून बातमी शोधा

Confusion during recruitment of Zilla Parishad health workers

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागासाठी आरोग्य सेवक, सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची 195 पदे भरण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेत सोमवारी आरोग्य विभागाने मुलाखती घेतल्या.

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी भरतीवेळी गोंधळ
sakal_logo
By
अजित झळके

सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागासाठी आरोग्य सेवक, सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची 195 पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेत सोमवारी आरोग्य विभागाने मुलाखती घेतल्या. उमेदवार व नातेवाईकांनी जिल्हा परिषद परिसरात गर्दी केली होती. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर वापराचा फज्जा उडाला. रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरु राहिल्याने उमेदवार, नातेवाईकांनी गोंधळ घातला. अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. 


जिल्हा परिषदेत आरोग्य विभागातर्फे 195 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदासाठी सोमवारी मुलाखती आयोजित केल्या होत्या. आयुष वैद्यकीय अधिकारी पदासाठी 25 पदे रिक्त आहेत. त्यासाठी 61 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले होते. स्टाफ नर्सच्या 120 जागा आहेत. 191 उमेदवारांचे अर्ज आले होते.

आरोग्य सेविकांच्या 50 पदासाठी 278 उमेदवारांनी अर्ज केले होते. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी जिल्हा परिषदेत दिवसभर गर्दी केली. नातेवाईकांनीही गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हते. सॅनिटायझरचाही वापर झालेला दिसत नव्हता. 


आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती थेट मुलाखतीद्‌वारे होणार होती. उमेदवारांची संख्या मोठी असल्याने विलंब लागला. रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरुच होती. जिल्हा परिषद आवारात गर्दीचे स्वरुप आले. जिल्ह्याच्या विविध भागातून उमेदवार आले होते. त्यांना गावाकडे परत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था नव्हती.

किती वेळ लागणार याबाबत माहिती दिली जात नसल्याने रात्री सव्वाआठ वाजता जिल्हा परिषदेत उमेदवारांसह नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रशासनाच्यावतीने सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू नातेवाईक ऐकत नव्हते. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गोंधळ कमी झाला.

संपादन : युवराज यादव