100 ग्रॅम सफरचंदावरून इचलकरंजीत गोंधळ; फळ विक्रेता ताब्यात | Apple | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

100 ग्रॅम सफरचंदावरून इचलकरंजीत गोंधळ; फळ विक्रेता ताब्यात
100 ग्रॅम सफरचंदावरून इचलकरंजीत गोंधळ; फळ विक्रेता ताब्यात

100 ग्रॅम सफरचंदावरून इचलकरंजीत गोंधळ; फळ विक्रेता ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - एका फळ विक्रेत्याने किलोला १०० ग्रॅम सफरचंद कमी दिल्याने जुन्या नगरपालिकेजवळ गुरूवारी गोंधळ उडाला. याची तक्रार देण्यासाठी ग्राहक मनवेल रॉड्रीक्स (रा. अशोकनगर) यांनी गावभाग पोलिस ठाण्यात फोन केला. मात्र काही प्रतिसादच मिळाला नाही. घटना घडून तासभर उलटला तरी पोलिसांकडून त्यांना प्रतिउत्तर मिळेना. अखेर रॉड्रीक्स यांनी थेट कोल्हापूर पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून तक्रार केली. त्यानंतर तत्परतेने बीट मार्शलची ११२ नंबर गाडी घटनास्थळी आली. त्यानंतर फळ विक्रेत्याला वजन मापे वजन तांगडीसह गावभाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, जुन्या नगरपालिकेलगत अनेक फळ विक्रेते आहेत. एका फळ विक्रेत्याकडे मनवेल रॉड्रीक्स हे गुरूवारी सफरचंद घेण्यासाठी गेले. त्यांनी १ किलो सफरचंद घेतल्यानंतर वजन कमी आल्याचे आढळले. याबाबत विक्रेत्याकडे चौकशी केली असता त्याने १ किलोच वजन असल्याचे सांगितले. त्यानंतर रॉड्रीक्स यांनी १ किलो वजनाची खात्री करण्यासाठी सफरचंदाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजनावर केले. त्यावेळी सफरचंदाचे वजन ९०० ग्रॅम दाखवले.

हेही वाचा: 'पक्या मुळीक गॅंग'वर 'मोक्का' अंतर्गत इस्लामपूर पोलिसांची कारवाई

त्वरीत त्यांनी फळ विक्रेत्याजवळ येऊन गावभाग पोलिसात फोन केला. अर्धातास गावभाग पोलिसात फोन लावूनही त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी थेट कोल्हापूर पोलिस नियंत्रण कक्षात याबाबत फोनद्वारे तक्रार दिली. त्वरीत ११२ नंबरची बीट मार्शल गाडी घटनास्थळी दाखल झाली. पोलिस येताच संतापलेल्या रॉड्रीक्स यांनी पोलिसांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर पोलिसांनी रॉड्रीक्स यांच्या तक्रारीची शहानिशा करत फळ विक्रेत्याला ताब्यात घेतले. यासह वजन मापे, वजन तांगडी ताब्यात घेतली आहे. फळ विक्रेत्याला गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

loading image
go to top