गुमास्ता परवान्यांविषयी दुकानदारांत नेमका संभ्रम आहे तरी काय ?

शिवाजी यादव
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

जिल्ह्यात विविध व्यवसायांची दुकाने सुरू आहेत. अनेकांना, ज्यांच्या दुकानात कामगार नाहीच अशांना गुमास्ता परवानगी काढावी लागत नाही, ही बाबच माहिती नाही. अनेकजण गुमास्ता परवाना काढतात, तर ज्यांच्या दुकानात कर्मचारी आहेत

कोल्हापूर - कोणत्याही व्यवसायासाठी गुमास्ता परवाना लागतो. ज्या दुकानात एकही कर्मचारी नाही, अशा दुकांनाना गुमास्ता परवाना काढणे आवश्‍यक नसल्याचे सांगण्यात येते; तर ज्या दुकानात कामगार आहेत, त्यांना मात्र गुमास्ता परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे गुमास्ता परवाना नसलेली दुकाने अधिकृत की अनधिकृत, हा प्रश्‍न आहे, तसेच या दुकानांना शासकीय योजना, सेवांचा लाभ घेण्याबाबत संभ्रम आहे. 

जिल्ह्यात विविध व्यवसायांची दुकाने सुरू आहेत. अनेकांना, ज्यांच्या दुकानात कामगार नाहीच अशांना गुमास्ता परवानगी काढावी लागत नाही, ही बाबच माहिती नाही. अनेकजण गुमास्ता परवाना काढतात, तर ज्यांच्या दुकानात कर्मचारी आहेत, त्यांना गुमास्ता परवाना काढावा लागतो, त्यासाठी शासनाला किरणा दुकानाला 23 रुपये शुल्क आहे, मात्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महा-ई-सेवाकेंद्राकडून वेगवेगळ्या शुल्कासह 400 रुपये आकारले जातात; तर काही मोजके दुकान मालक ऑनलाइन प्रक्रियेचा लाभ घेत फक्त 23 रुपये भरतात. 

हेही वाचा - लयभारी ! रिक्षा चालकांचा असाही प्रामाणिकपणा 

शासकीय स्तरावर नोंदणी आवश्यक

शहरात जवळपास अडीच हजारांवर दुकाने आहेत. यांतील 30 टक्के दुकानांत कामगार नाहीत; तर उर्वरित दुकानांत कामगार आहेत. त्यामुळे ज्या दुकानांत कामगार आहेत, त्यांनी गुमास्ता परवाना काढणे बंधनकारक आहे; मात्र अशा गुमास्ता परवानाधारक दुकानांत कामगार विभागाचे अधिकारी वर्षानुवर्षे दुकानाचे तपशील तपासणीसाठी गेलेले नाहीत. शहरात वाढत्या वस्तीनुसार उपनगरांत नव्याने दुकाने झाली आहेत. यांत किराणा माल दुकान वजा पानटपरी, बेकरी, आईस्क्रीम विक्री, हॉटेल, खानावळ, कोल्ड्रिंक हाऊस अशी लहान दुकाने आहेत. अनेकदा यांतील काही दुकाने गृहिणी चालवतात. कुटुंबाला अर्थिक हातभार व्हावा, यासाठी सुरू केलेला हा घरगुती व्यवसाय आवश्‍यक असला, तरी त्याची नोंद शासकीय स्तरावर होणे आवश्‍यक आहे. अशा दुकानांना कर्ज व विम्यापासून ते वीज मीटर घेण्यापर्यंत सोयीसुविधांचा लाभ घ्यावा लागतो; त्यासाठी शासकीय स्तरावर नोंद आवश्‍यक आहे. 

हेही वाचा - दाजीपूर अभयारण्य या तारखेपासून खुले

कामगार नसलेल्या दुकानांना परवाना गरजेचा नाही 

कामगार नसलेल्या दुकानांना गुमास्ता परवाना बंधनकारक नसल्याने या दुकानांनी शासकीय सुविधांचा लाभ घ्यावा कसा?, हे दुकान अधिकृत की अनधिकृत, या दुकानातून काही दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची? नुकसान भरपाई देण्यासाठी, मागण्यासाठी दुकान पात्र असेल का? आदी प्रश्‍न अनुत्तरित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion In Shopkeepers On Gumasta Licence