कॉंग्रेसचे नेते सुस्त... कार्यकर्ते अस्वस्थ 

विकास कांबळे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी भेटीगाठी घेण्यासाठी पायाला भिंगऱ्या बांधल्या आहेत. चांगले कार्यकर्ते पक्षात घेण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत. स्थानिक पातळीवरील गटांना महत्त्व देत आहेत. उमेदवारीसाठी गर्दी असणारे पक्षही आपल्या याद्या जाहीर करू लागले आहेत; पण शतकी परंपरा असणाऱ्या कॉंग्रेसमध्ये मात्र शांतता आहे. जिल्ह्यातील नेत्यांच्या शांततेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता आहे. 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी भेटीगाठी घेण्यासाठी पायाला भिंगऱ्या बांधल्या आहेत. चांगले कार्यकर्ते पक्षात घेण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत. स्थानिक पातळीवरील गटांना महत्त्व देत आहेत. उमेदवारीसाठी गर्दी असणारे पक्षही आपल्या याद्या जाहीर करू लागले आहेत; पण शतकी परंपरा असणाऱ्या कॉंग्रेसमध्ये मात्र शांतता आहे. जिल्ह्यातील नेत्यांच्या शांततेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता आहे. 

दुसरीकडे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा असणारा दोस्ताना, महाडिकांचे भाजपमध्ये वाढलेले प्रस्थ आणि श्री. महाडिक यांना सोबत घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कॉंग्रेस फोडण्यासाठी केलेल्या खेळी, या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे जिल्ह्यातील नेते बोटचेपेपणाची भूमिका घेत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. नेत्यांच्या या बोटचेपे धोरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांबद्दलच आता संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

प्रचाराला जेमतेम आता पंधरा दिवसच मिळणार आहेत. अशी परिस्थिती असताना आणि उमेदवारी मागणीसाठी गेल्या निवडणुकीइतकी इच्छुकांची गर्दी नसतानाही कॉंग्रेसचे जिल्ह्याचे नेते अद्याप साधी चार जणांच्या नावाची उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध करू शकले नाहीत. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून गेल्या निवडणुकीपर्यंत उमेदवारीसाठी केवळ कॉंग्रेस पक्षाकडेच गर्दी असायची. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यामध्ये थोडा फरक पडला; पण भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेकडे यापूर्वी फारशी गर्दी झाली नव्हती. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसचे नेते निवांत असायचे. या वेळी मात्र परिस्थिती उलटी झाली आहे. 

दोन्ही कॉंग्रेसवरील नाराज कार्यकर्त्यांवर भाजपने लक्ष ठेवत त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी माजी आमदार महादेराव महाडिक यांची खूप मदत घेतली. महाडिक यांचे सहकाराच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्याचा उपयोग भारतीय जनता पक्षाने करून घेतल्यामुळे या निवडणुकीत भाजपची हवा होण्यास मदत झाली. 

भारतीय जनता पक्षाची चाल ओळखून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्या त्या तालुक्‍यात जोडण्या करण्यास सुरवात केली. ज्या ठिकाणी बिघडले होते त्या ठिकाणी दुरुस्ती केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा भाजपने आपणास धोका दिला, असा समज झाल्यानंतर त्यांनीदेखील भाजपच्या उलट मोट बांधण्यास सुरवात केली. 

कॉंग्रेसची जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय वाईट आहे. कोल्हापूर एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता; पण आता त्यांना काही तालुक्‍यांमध्ये उमेदवार मिळू शकत नाहीत. अशी परिस्थिती असतानाही त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून तालुकावर बैठका घेणे अपेक्षित होते. कॉंग्रेस सोडून जाणाऱ्यांना थांबविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक होते; पण तसे काही होताना दिसले नाही. कॉंग्रेसमधील कार्यकर्ते फोडण्यासाठी श्री. महाडिक यांनी भाजपला मदत केली. तरीदेखील जिल्ह्याचे नेते शांतच राहिले. 

घालमेल वाढणार 
राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. कॉंग्रेसची यादी मात्र अद्याप जाहीर झालेली नाही. प्रचारासाठी कमी दिवस मिळणार असल्याने ही यादी लवकर जाहीर करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे; पण त्याकडे लक्ष देण्यास नेत्यांना वेळ नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा विचार जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचा आहे. उमेदवारांची यादी जाहीर होण्यास जेवढा विलंब लागेल तेवढी कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढणार आहे.

Web Title: Congress activists upset