नोटबंदीविरोधात कॉंग्रेसचे ठिय्या आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

कोल्हापूर - नोटबंदीविरोधात आज कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन करण्यात आले. "मोदी सरकार हायऽ हायऽऽ', "गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है', "मोदी सरकारचे करायचं काय...', यासारख्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. घोषणाबाजीनंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन दिले. 

कोल्हापूर - नोटबंदीविरोधात आज कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन करण्यात आले. "मोदी सरकार हायऽ हायऽऽ', "गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है', "मोदी सरकारचे करायचं काय...', यासारख्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. घोषणाबाजीनंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन दिले. 

नोटबंदीच्या निर्णयानंतर देशात अराजकता निर्माण झाल्याचा आरोप करून 50 दिवसांनंतरही बॅंक व एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध उठलेले नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेसतर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा आदेश दिला होता. आंदोलनाची वेळ सकाळी 11 ची पण सकाळपासूनच कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जमू लागले. 

सुमारे साडेबाराच्या सुमारास आमदार सतेज पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले. त्यानंतर त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी डॉ. सैनी यांच्या दालनाबाहेर ठिय्या मारला. श्री. पाटील यांच्यासोबत अखिल भारतीय कॉंग्रेसचे रघुजी देसाई, सुधीर जानजोत होते. कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून हा परिसर दणाणून सोडला. सुमारे अर्धा तास घोषणाबाजी झाल्यानंतर श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. 

नोटबंदीमुळे गेल्या 50 दिवसांत लोकांना अनेक अडचणी आल्या. शेतकरी, कष्टकरी, उद्योजकांना प्रचंड मानसिक त्रास झाला. पिकांचे भाव गडगडल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. उद्योगात मंदीचे वातावरण आहे. जे कारखाने तीन शिफ्टमध्ये चालत होते आज त्या कारखान्यात एक शिफ्टमध्ये काम सुरू आहे. जिल्ह्यातील या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून त्याचा अहवाल केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. 

व्यवहारातील 97 टक्के नोटा जमा झाल्या, त्यात एकही नोट बनावट नाही. अतिरेकी हल्ले रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले; पण या काळातही हल्ले झालेत. भ्रष्टाचार रोखण्याचे कारण दिले, पण या काळातही लाचखोर अधिकारी सापडले. ही सर्व कारणे चुकीची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "कॅशलेस' व्यवहाराची टुम आणल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. 

आंदोलनात माजी आमदार बजरंग देसाई, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रदेश सचिव तौफिक मुल्लाणी, ऍड. सुरेश कुराडे, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सरला पाटील, महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, माजी महापौर अश्‍विनी रामाणे, वंदना बुचडे, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष दीपक थोरात, ग्राहक सेलचे संजय पाटील, संजय पवार-वाईकर, गणी आजरेकर, सुरेश सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेतील कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

नुकसानीचे सर्वेक्षण करा : आमदार पाटील 
आमदार सतेज पाटील म्हणाले, "ज्या हेतूसाठी ही नोटबंदी केली तो साध्य झालेला नाही. सामान्य माणसाला याचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. या निर्णयाने शेतीमालाचे भाव गडगडले, शेतकऱ्यांना कर्जे मिळेनात. उद्योगात मंदी निर्माण झाली. यातून जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. याचे सर्वेक्षण करण्याची गरज असून जिल्हाधिकारी हे शासनाचे प्रतिनिधी असल्याने त्यांनी याचा अहवाल तयार करावा या मागणीसह लोकांत असलेल्या असंतोषाची जाणीव त्यांना करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. 

गांधींच्या प्रश्‍नांची उत्तरे द्या : देसाई 
अखिल भारतीय कॉंग्रेसचे प्रतिनिधी व जिल्ह्याचे समन्वयक रघुजी देसाई म्हणाले, "नोटबंदीनंतर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही प्रश्‍न पंतप्रधान मोदी यांना विचारले होते. या प्रश्‍नांची ते उत्तरे का देत नाहीत? संपूर्ण देशात या निर्णयाचा फटका सामान्यांना बसला आहे. त्यांचे अर्थकारण ठप्प आहे. त्याला संपूर्णपणे मोदी सरकार जबाबदार आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आहे.'

Web Title: Congress agitation against notabandi