लोकसभेत भाजपचा प्रचार करूनही 'या' आमदारावर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करूनही काँग्रेसने माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ज्या जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा उघड उघड प्रचार केला आणि भाजपच्या उमेदवाराला निवडूनही आणले, त्याच आमदार गोरे यांची काँग्रेसने विधीमंडळातील प्रतोद म्हणून नेमणूक केली आहे.

मुंबई: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करूनही काँग्रेसने माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ज्या जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा उघड उघड प्रचार केला आणि भाजपच्या उमेदवाराला निवडूनही आणले, त्याच आमदार गोरे यांची काँग्रेसने विधीमंडळातील प्रतोद म्हणून नेमणूक केली आहे.

जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा देण्याची जाहीर भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईही करण्याची तयारी काँग्रेसने केली होती.  मात्र आता जयकुमार गोरे यांना काँग्रेसने प्रतोदपद दिलं आहे. त्यावरुन राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही.

जयकुमार गोरे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विश्वासातील असल्याचे मानले जात होते. राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे अनेक आमदार फोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. यामध्ये जयकुमार गोरे यांचंही नाव होतं पण आता जयकुमार गोरे यांच्यावर काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress appoints jaykumar gore as partys whip in assambly