काँग्रेसकडून नोटबंदीचे श्राध्द, प्रधानमंत्री फाशीचा शब्द पाळणार का?

काँग्रेसकडून नोटबंदीचे श्राध्द, प्रधानमंत्री फाशीचा शब्द पाळणार का?

सांगली : भाजप सरकारच्या फसलेल्या नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण व केंद्र सरकारचा चार वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यानिमित्त काँग्रेसतर्फे आज काँग्रेसभवन येथे नोटबंदीचे विधीवत श्राध्द घालण्यात आले. भाजप सरकारच्या चार वर्षातील अपयशी कारभाराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार मोहनराव कदम, शहराध्यक्ष पृथ्वराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्ह्याचे प्रभारी प्रकाश सातपूते, सहप्रभारी संजय पाटील आदीच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. फसलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाल्याने कॉंग्रेसभवन चौकात नोटबंदीचे विधीवत श्राध्द घातले.

काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यानी भाजपच्या अपयशाचा निषेध करीत घोषणांनी परिसर दणाणून सोडला. "भाजप सरकार हाय हाय, पुढच्या वर्षी बाय बाय,' अशा घोषणा देण्यात आल्या. मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीचा निर्णय जाहीर करीत जनसामान्यांचे हाल केले. काळा पैसा बाहेर आणू आणि गरीब जनतेच्या बॅंक खात्यावर प्रत्येकाला लाख देवू असे फसवे आश्वासन देवून मोदी सरकार सत्तेवर आले. मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात करीत फसवी नोटबंदी केली. उद्योजक, व्यापाऱ्यांना संकटात टाकणारा जीएसटीचा निर्णय चुकीच्या पध्दतीने राबविला. अशा भाजप सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

प्रकाश सातपूते म्हणाले, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यावर दोन लाख कोटींचे कर्ज वाढले, पण प्रत्यक्षात विकास आणि रोजगार वाढलेलाही दिसत नाही. लाख लोकांचे रोजगार नोटबंदीमुळे गेले असून वाढत्या बेरोजगारीमुळे युवकांमध्ये भाजपविरोधात असंतोष आहे. भाजप सरकार हे नाटकी असून शेतकरी कर्जमाफीची फसवी घोषणा करुन शेतकऱ्यांची चेष्टाच केली आहे.''

शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, "मोदींनी नोटबंदीचा निर्णय फसला तर मला चौकात फाशी द्या असे वक्तव्य केले होते. आता नोटबंदीचा निर्णय फसलेला असल्याचे जगभरातील सर्व अर्थतज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे आता प्रधानमंत्री आपला शब्द पाळणार का ? असा सवाल आहे.'' सुवर्णा पाटील, अजित ढोले, नंदू शेळके, हंबीरराव मोहिते, राजन पिराळे, सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com