Vidhan Sabha 2019 : पंढरपूरच्या जागेवर काँग्रेस ठाम

भारत नागणे 
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात यावर्षी कमालीची चुरस निर्माण झाली आहे. माजी आमदार सुधाकर परिचारकांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला रंगत आली आहे.

पंढरपूर : पंढरपूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता शिगेला पोचला आहे. काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने चिडून काँग्रेस नेत्यांनी ही पंढरपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येथील जागेरून निवडणूक प्रचारापूर्वीच दोन्ही काँग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे. दरम्यान काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही, अशी भूमिका जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे पंढरपुरात आघाडीतील बिघाडी महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात यावर्षी कमालीची चुरस निर्माण झाली आहे. माजी आमदार सुधाकर परिचारकांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला रंगत आली आहे. महायुतीने राजकारणातील मुरब्बी सुधाकर परिचारकांना उमेदवारी देत विरोधी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. परिचारकांच्या विरोधात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या आमदार भारत भालकेंना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादीने काँग्रेसच्या जागेवर उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसनेही शह देत जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजी काळुंगे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. पंढरपुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपले उमेदवार दिल्याने येथील निवडणुकीत ट्विस्ट आणखी वाढले आहे.

राज्यात काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी असतानाच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि सोलापूर मध्य या तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने काँग्रेस आणि शेकाप उमेदवाराविरोधात बंड पुकारले आहे. अशातच पंढरपूरमधून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस आपली उमेदवारी मागे घेणार नाही, अशी भूमिका काँग्रेस उमेदवारासह जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी घेतली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आणखी काय घडामोडी घडतात याकडेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress is not agree with NCP Seat Sharing in Pandharpur Vidhan Sabha 2019