कोल्हापुरात सहा तालुक्‍यात कॉंग्रेस अस्तित्त्वहिन

निवास चौगले
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे जिल्ह्यात सर्व तालुक्‍यात कमी-अधिक प्रमाणात नेटवर्क आहे. त्याचा फायदा ते उठवू शकतात. पण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याशी त्यांचे मतभेद आहेत. महाडीक व सतेज पाटील वाद तर टोकाला पोहचला आहे. चंदगडचे माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांचा गट, भुदरगडमधील माजी आमदार बजरंग देसाई, शिरोळचे दिलीप पाटील हे काँग्रेसचे असले तरी "गोकुळ' च्या राजकारणात ते महाडिकांसोबत आहेत.

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला सहा तालुक्‍यात उमेदवारही मिळणार नाहीत, अशी स्थिती आहे. या सहा तालुक्‍यात पक्षाचे अस्तित्त्व शुन्य असूनही नेते मात्र अद्याप हवेतच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात विधानसभेत या जिल्ह्यातला एकही आमदार काँग्रेसचा नाही. अंतर्गत मतभेद व त्यातून पाडापाडीच्या राजकारणामुळे जिल्हाध्यक्षही निवडून येऊ शकले नाहीत ही या पक्षाची शोकांतिका आहे. नगरपालिका निवडणुकीतही नऊ पैकी सहा नगरपालिकांत काँग्रेसचा हात नव्हता. आता तर कागलसह, पन्हाळा, शाहुवाडी, भुदरगड, आजरा व चंदगडमध्ये पक्षाला खंबीर असे नेतृत्त्वच नाही.

माजी आमदार महादेवराव महाडीक हे पुर्वी काँग्रेसमध्ये होते, आता त्यांनी भाजपाची कास धरली आहे. त्याचा फटका पक्षाला नगरपालिका निवडणुकीत बसला. जिल्ह्यातील प्रमुख अर्थिक सत्ता केंद्र असलेले "गोकुळ' ही संस्था त्यांच्याच ताब्यात आहे. या जोरावर ते भुदरगड, आजरा व चंदगडमधील काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या मागून फिरवू शकतात एवढी त्यांची ताकद आहे. इतर निवडणुकीपेक्षा "गोकुळ' ची सत्ता बरी असल्याने त्यांच्याविरोधात काँग्रेसमधील कोणी नेते जातील अशी सध्यातरी स्थिती नाही. राज्यात व देशातही भाजपाचे सरकार असल्याने व श्री. महाडीक यांचे एक पुत्र भाजपाचे आमदार असल्याने त्या जोरावर ते कोणालाही नामोहरम करतील अशी स्थिती आहे.

विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे जिल्ह्यात सर्व तालुक्‍यात कमी-अधिक प्रमाणात नेटवर्क आहे. त्याचा फायदा ते उठवू शकतात. पण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याशी त्यांचे मतभेद आहेत. महाडीक व सतेज पाटील वाद तर टोकाला पोहचला आहे. चंदगडचे माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांचा गट, भुदरगडमधील माजी आमदार बजरंग देसाई, शिरोळचे दिलीप पाटील हे काँग्रेसचे असले तरी "गोकुळ' च्या राजकारणात ते महाडिकांसोबत आहेत.

पन्हाळा व शाहुवाडीत पक्ष आहे का नाही अशी स्थिती आहे. करवीर, हातकणंगले व शिरोळमध्ये बऱ्यापैकी कॉंग्रेसची ताकद असली तरी अंतर्गत मतभेदामुळे पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यापेक्षा पाडापाडीचे राजकारणच जास्त होणार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी यश किती मिळेल यासाठी निकालाचीच वाट पहावी लागेल.

Web Title: congress trouble in kolhapur district