सिद्धाराम म्हेत्रेंनी सांगताच कॉंग्रेसची माघार 

प्रमोद बोडके
सोमवार, 13 जानेवारी 2020

माजीमंत्री म्हेत्रेंवर सामाजिक दबावाची चर्चा 
अक्कलकोट विधानसभा मतदार संघात लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य आहे. शिवानंद पाटील, मल्लिकार्जुन पाटील आणि शिलवंती भासगी हे तिन्ही लिंगायत समाजातून येतात. लिंगायत समाजातील तिन्ही सदस्यांना अपात्र केल्यास माजीमंत्री म्हेत्रे यांना भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल? 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि उद्याच्या निवडणुका याबाबत सामाजिक दबाव आणल्याची चर्चा आज दुपारपासून अक्कलकोट, सोलापूर परिसरात रंगली आहे. याच सामाजिक दबावामुळे हे प्रकरण माजीमंत्री म्हेत्रे यांनी सोडून दिल्याचे समजते. 

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी करणारे कॉंग्रेसचे सदस्य मल्लिकार्जुन पाटील व शिलवंती भासगी आणि अपक्ष सदस्य असलेले शिवानंद पाटील यांना अपात्र करण्याबाबतचे पत्र आज कॉंग्रेसने मागे घेतले आहे. गटनेते संजय गायकवाड यांनी सुनावणीपूर्वीच हे पत्र मागे घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितल्याने आपण हे पत्र मागे घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते गायकवाड यांनी दिली. 

aschim-maharashtra/first-five-shiv-bhojan-centers-nagar-251942">हेही वाचा - शिवथाळीला अखेर "हा' मुहूर्त 
जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील आणि सदस्या शिलवंती भासगी यांनी अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केले होते. मल्लिकार्जुन पाटील यांनी उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान केले होते. राष्ट्रवादीच्या सहा व कॉंग्रेसच्या तीन सदस्यांनी बंडखोरी केल्याने या निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीने सहा सदस्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे पत्र दिले आहे. त्यावर आज सुनावणी झाली असून उद्या (मंगळवार) दुपारी 1 एक वाजता सुनावणी होणार आहे. 
कॉंग्रेसचे गटनेते गायकवाड यांनीही असेच पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले होते. या पत्रावर देखील तीन सदस्यांची सुनावणी आज होणार होती. सुनावणी पूर्वीच गायकवाड यांनी कारवाईचा अर्ज मागे घेतला आहे. अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करणारे कॉंग्रेसचे सदस्य उद्याच्या (मंगळवार) सभापती निवडीत कोणासोबत राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
हेही वाचा - नसेल फास्टटॅग तर आजपासून डबल टोल 
कॉंग्रेसला ऑफर समितीची 
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीने मित्रपक्ष असलेल्या शेकाप आणि कॉंग्रेसला काहीही दिले नव्हते. दोन्ही जागा स्वतः: लढविल्या होत्या. विषय समितीच्या चार जागांसाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीने एक जागा शेकापला आणि एक कॉंग्रेसला देण्याची तयारी केली आहे. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे सात सदस्य आहेत. त्यापैकी पाच सदस्य माजीमंत्री म्हेत्रे यांच्याकडे आहेत. कॉंग्रेसच्या कोट्यातून सभापतिपदावर कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress withdraws as soon as Siddaram Mhetre says