मलकापुरात भाजप 'क्लीन बोल्ड'; रंगीत तालीम कॉंग्रेसने जिंकली

मलकापुरात भाजप 'क्लीन बोल्ड'; रंगीत तालीम कॉंग्रेसने जिंकली

कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली. 

मलकापूर निवडणुकीत स्थानिक मुद्यांना बगल देत थेट पृथ्वीराज चव्हाण अन्‌ काँग्रेसलाच भाजपकडून ‘टार्गेट’ केले गेले. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून चव्हाणांना ‘टार्गेट’ करत थेट घरी बसवण्याची भाषाही वापरली गेली. त्याशिवाय कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रश्नही ‘हायलाइट’ केले गेले. त्यामुळे जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्राचे मलकापूर पालिकेच्या निकालाकडे लक्ष लागले होते. त्यात काँग्रेसची सरशी झाली. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे झालेले मनोमिलन, राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली साथ अशा अनेक गोष्टी विजयाला पूरक ठरल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय बेरजेचे गणित जुळवताना भाजपसाठी धोक्‍याची घंटा ठरणारा निकाल म्हणूनही मलकापूरच्या निकालाकडे पाहणे गरजेचे आहे. 

पालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधीपासून भाजपने येथे जुळवाजुळव केली होती. त्यात त्यांनी अनेकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता. ते यशस्वीही झाले. वारेमाप आर्थिक नियोजनामुळे काँग्रेसमोर त्यांनी लढाई उभी केली. भाजपचे नेतृत्व विठ्ठल-रुक्‍मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केले. काँग्रेसने आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेलची बांधणी केली. पॅनेल बांधणीचे काम मनोहर शिंदे यांनी केले. पॅनेल बांधताना काँग्रेसने केलेली गोळाबेरीज त्यांना विजयश्री खेचून आणण्यात अत्यंत महत्त्वाची ठरली. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळाकर यांच्या गटाला सोबत घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत त्यांनाही विश्वासात घेतले. मात्र, याउलट भाजपने स्थानिक विकासासह त्यामध्ये राहिलेल्या त्रुटींवर भर देत निवडणूक गाजविण्याचा प्रयत्न केला. विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण निर्माण करून भाजपने थेट पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ केले. त्यावेळी अत्यंत खालच्या पातळीवर जावून झालेल्या टीका त्यांना येथे धोक्‍याच्या ठरल्या, असे म्हणण्यास वाव आहे. 

भाजपने पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करताना ते निष्क्रिय आहेत, त्यांना फंड आणता आला नाही. ते केवळ पोकळ विकासाच्या गप्पा मारतात. त्यांना आता आम्ही घरी बसवणार, असा प्रचार झाला. त्या प्रचारात भाजपने ताकद लावताना चार ते पाच मंत्र्यांच्या सभाही येथे घेतल्या. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष घालून मलकापूरवर झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न केले. दहा दिवसांच्या कालावधीत किमान चार वेळा ते मलकापुरात आले. त्याशिवाय भाजपच्या प्रचार प्रारंभ, प्रचाराची सांगता सभेसह अन्य सभांमध्येही भाषण देत थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आरोप केले. नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, भाजपचे नेते पाशा पटेल, मंत्रिपदाचा दर्जा असणारे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनीही प्रचारसभा गाजविल्या. त्यात पृथ्वीराज चव्हाणच ‘टार्गेट’ होते. सत्तेची स्वप्ने बघताय. मात्र, बाबा आता तुमचे घर सांभाळा, असे म्हणत दक्षिणच्या मतदारसंघातील उणिवांवर हल्लाही केला गेला. त्यामुळे अत्यंत खालच्या पातळीवर जावून झालेली टीका महागात ठरलीच. 

त्याशिवाय काँग्रेसने टीका न करता थेट विकासावर लक्ष केंद्रित करत प्रत्येक सभेतून मांडलेला ‘अजेंडा’ही लोकांना भावला, असेही म्हणण्यास वाव आहे. स्थानिक पातळीवर जुळवलेल्या काँग्रेस अंतर्गत आघाडीचा नक्कीच फायदा झाल्याने काँग्रेस विजयापर्यंत पोचली, असेही यातून स्पष्ट होते. भाजपने वातावरणनिर्मिती करत सगळ्या पातळ्यांवर ताकद लावून निवडणूक ताब्यात घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे त्यांच्यासाठी मलकापूरची निवडणूक विधानसभेपूर्वीची रंगीत तालीम होती. मात्र, त्या  रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली आहे. मलकापुरात जमलेले राजकीय सूत्रच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तालुक्‍यात कायम राहीलच. मलकापूरचा निकाल बेफाम निघालेल्या भाजपलाही धोक्‍याच्या घंटेची जाणीव करून देणाराच आहे.

कऱ्हाडकरही चर्चेत...
कऱ्हाड पालिकेच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यासह अनेक नगरसेवक मलकापूरच्या पालिकेत सक्रिय होते. कऱ्हाडला राजकीय वजन असणारी मंडळी भाजपच्या सांगता सभेत प्रत्यक्ष व्यासपीठावरही आली. त्यामुळे नक्की निकाल काय लागणार, याची उत्सुकता होती. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दुरावलेली कऱ्हाडची राजकीय मंडळी मलकापुरात मात्र थेट भाजपच्या व्यासपीठावर आल्याने मलकापूरच्या निवडणुकीच्या निमित्ताने कऱ्हाडकरही चर्चेत आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com