काँग्रेसने देशाचा खोटा इतिहास लिहिला : डॉ. दा. वि. नेने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

सारेकाही माहिती असून माझ्यासारखा माणूस बोलू शकला नाही. ते धाडस मला 2014 सालानंतर आले. सन 2002 च्या गुजराज दंगलीनंतर जगात मोदींच्या नाचक्कीचा प्रयत्न झाला, मात्र मी त्यातील वास्तवाचा साक्षीदार आहे. मोदी सत्तेवर येणे हे सुदैव आहे.

सांगली : सत्ताधारी काँग्रेसने देशाचा खोटा इतिहास लिहिला. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर माझ्या सारख्यांना तो इतिहास खोटा असल्याचे सांगण्याची आणि खरा इतिहास मांडण्याची हिंमत आली. स्वा. सावरकरांनी प्रचंड यातना सहन करून अवघड काम पूर्ण केले. आम्हीही सावरकरांचे विचार, त्यांचा इतिहास रुजवताना थकणार नाही, असे मत तिसाव्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. दा. वि. नेने तथा दादूमियाँ यांनी आज येथे व्यक्त केले. 

विश्रामबाग येथील स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या प्रांगणात खासदार शरद बनसोडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष खासदार संजय पाटील, कार्याध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकरराव गोखले, भाजपचे संघटक रघुनाथ कुलकर्णी आणि नियोजन समिती अध्यक्ष मकरंद देशपांडे होते. 

दादूमियाँ यांनी सावरकरांविषयी फार भाष्य न करता काँग्रेसी धोरण, नेहरूंचा सावकर व्देष आणि भाजपचे सध्याचे सरकार आणि आगामी निवडणुका यावर जोर दिला. ते म्हणाले, "जो जिंकतो त्याला इतिहास लिहिण्याचा अधिक असतो. देशात काँग्रेस जिंकत होती आणि विजेता म्हणून त्यांनी सतत खोटा इतिहास लिहिला. नेहरूंनी समाजवाद स्वीकारून देशाला खड्ड्यात घातले. ते सावरकर व्देष्टे होते. त्यांनी कूटनिती केली नसती तर सावरकर या देशाचे पहिले अध्यक्ष आणि सुभाषचंद्र बोस पहिले पंतप्रधान झाले असते. 

सारेकाही माहिती असून माझ्यासारखा माणूस बोलू शकला नाही. ते धाडस मला 2014 सालानंतर आले. सन 2002 च्या गुजराज दंगलीनंतर जगात मोदींच्या नाचक्कीचा प्रयत्न झाला, मात्र मी त्यातील वास्तवाचा साक्षीदार आहे. मोदी सत्तेवर येणे हे सुदैव आहे.

ते म्हणाले, "जागतिक महासत्ता असलेली अमेरिका भारतासह जगातील अर्थकारण स्वतःच्या मूठीत ठेऊ पाहतेय. अशा काळात सुदैवाने मोदींसारखा अर्थतज्ज्ञ लाभलाय. त्यामुळे अमेरिका भारतातील वेगवेगळ्या विचारांच्या लोकांच्या डोक्‍यात सवलतींची मागणी पेरते, फोडा आणि राज्य करा नीतीचा हा वेगळा पैलू आहे. मोदी विरुद्ध सारे असा सामना आता रंगवला जातोय, मात्र विरोधांची एकी टिकणार नाही, कारण त्यांच्याकडे काळा पैसा शिल्लक नाही. त्यातील प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे.'' 

खासदार बनसोडे म्हणाले, "सावरकरांवर त्या काळीही अत्याचार झाले आणि आजही इंग्रज अधिकाऱ्यांच्या रुपातील काही लोक वास्तवात आहेत. सध्याचे सरकार हे सावरकरांना अभिप्रेत असलेल्या मार्गाने चालवले जात आहे.'' 

गोखले म्हणाले, "सावरकरांच्या साहित्याची पुनर्तपासणी, अभ्यास झाला तर खूप नव्या गोष्टी अजूनही समोर येऊ शकतील.'' 

रघुनाथ कुलकर्णी म्हणाले, "मोदींचे सरकार स्वा. सावकरकरांचा विचारांतूनच राष्ट्रविकासाचा विचार रुजवत आहे'' 

प्रसिद्ध नृत्यांगणा धनश्री आपटे यांचा तेजोमय तेजोनिधी हा नृत्याविष्कार झाला. मकरंद देशपांडे यांनी स्वागत केले. बाळासाहेब देशपांडे यांनी आभार मानले. बापूसाहेब पुजारी, विजय नामजोशी, सुहास जोशी, नितीन शिंदे, दीपक शिंदे, नीता केळकर आदी उपस्थित होते. 

Web Title: Congress Written Wrong History Says Dr D V Nene