कॉन्स्टेबल अजय सावंत ‘सायबर मास्टर’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - नाव अजय संतराम सावंत. पद पोलिस कॉन्स्टेबल. शिक्षण बी कॉम, बीसीए. एडीआयटी, एमएसआयटी. मराठी आणि इंग्रजी टायपिंग. गाव वाकरे (ता. करवीर) अशी ओळख असलेल्या अजय सावंत यांची आता दुसरी ओळख ‘सायबर मास्टर’ म्हणूनही झाली आहे.

कोल्हापूर - नाव अजय संतराम सावंत. पद पोलिस कॉन्स्टेबल. शिक्षण बी कॉम, बीसीए. एडीआयटी, एमएसआयटी. मराठी आणि इंग्रजी टायपिंग. गाव वाकरे (ता. करवीर) अशी ओळख असलेल्या अजय सावंत यांची आता दुसरी ओळख ‘सायबर मास्टर’ म्हणूनही झाली आहे.

कोल्हापुरात घडलेल्या सायबर गुन्ह्यात बिहार, दिल्लीपर्यंतची पाळेमुळे शोधून काढून त्यांनी टोळीला गजाआड करून ‘मास्टर’ असल्याचे सिद्ध केले आहे. पोलिस दलाने त्यांना आजपर्यंत दहाहून अधिक बक्षिसे देऊन गौरविले आहे. कोल्हापुरातील सायबर क्राईमचे गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आण्यासाठी ते महत्त्वाचे ठरत आहेत.

ऑनलाईन फसवणूक तक्रारीवर तातडीने शोध घेऊन फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. खाकीवर्दीचे त्यांना आकर्षण होते. त्यातून त्यांनी पोलिस भरतीसाठी प्रयत्न केले आणि ते पोलिस कॉन्स्टेबल म्हणून रत्नागिरीत भरती झाले. मात्र त्यातूनही वेगळंपण म्हणजे त्यांनी ‘सायबर क्राईम’चे गुन्हेगार शोधण्यात मास्टरकी मिळवली. सध्या ते कोल्हापूरच्या सायबर पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. रत्नागिरीत त्यांना कर्तव्य बजावण्याची संधी मिळाली आणि त्यांनी तेथूनच ‘गुगल ड्राईव्ह’च्या मदतीने ‘डाटा’ एकत्रित केला. यातून पुढे गंभीर गुन्हे निकाली काढण्यासाठी त्याची मदत झाली. अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात सलग तीन वर्षे त्यांना बक्षीस मिळाले. गुंतागुंतीचे अनेक गुन्हे त्यांनी गुगल आणि सायबर क्राईमच्या अभ्यासातून सोडवले. बिहारपर्यंत जाऊन त्यांनी सायबर  क्राईममधील मास्टर माईंडना गजाआड केले. ऑनलाईनच्या माध्यमातून होणारी फसवणूक रोखणे, इंटरनेटद्वारे झालेले गुन्हे उघडकीस आणले, त्यामुळेच ते आज कोल्हापूर सायबर पोलिस ठाण्यात ‘सायबर मास्टर’ म्हणून ओळखले जात आहे.

‘प्रतिसाद’साठी मोठे योगदान
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसाकंडून देण्यात आलेल्या ‘प्रतिसाद’ ॲपची तयारी रत्नागिरी जिल्ह्यातूनच झाली. ‘प्रतिसाद ॲप’ तयार करण्यासाठी आवश्‍यक ती सर्व मदत संबंधित कंपनीला त्यांनी करून दिली. त्यातूनच रत्नागिरीत हे ॲप राज्यात पहिल्यांदा सुरू केले. आजही त्याचा उपयोग महिलांसाठी होत आहे.

शिबिरातून मार्गदर्शन
ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी वेळोवेळी शिबिरे घेऊन मार्गदर्शन केले आहे. शाळा कॉलेजमध्ये तरुणांना ‘सायबर गुन्हे’ कसे घडतात. त्यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावे, याबाबत मार्गदर्शन केले आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांसमोर त्यांनी मार्गदर्शन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Constable Ajay Sawant Cyber Master special story