कोल्हापूर : रेड झोनमधील बांधकाम परवाने तूर्त बंद

कोल्हापूर : रेड झोनमधील बांधकाम परवाने तूर्त बंद

कोल्हापूर - शहरासाठीची निळी आणि लाल पूररेषा नव्याने बनविण्याची प्रक्रिया पाटबंधारे विभागातून सुरू असल्याने महापालिकेने १२ जुलैपासून रेड झोनमध्ये नव्याने होणाऱ्या प्रकल्पांना तूर्त बांधकाम परवाने देणे बंद केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. एम. एस. कलशेट्टी यांनी दिली. 

महापुरानंतर शहरातील आरोग्य, साफसफाई, पाणीपुरवठा याबाबतीत आज पत्रकारांनी आयुक्त कलशेट्टी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी रेड झोनमधल्या बांधकामाचा विषय उपस्थित झाल्यानंतर कलशेट्टी यांनी १२ जुलैपासून या विभागात नवे बांधकाम परवाने देणे बंद केल्याचे पत्रकारांना सांगितले. 
कोल्हापूर शहराला ५ ऑगस्टला पुराच्या पाण्याने वेढले. बघता बघता पुराचे पाणी शहरातील नागरी वस्त्यांमध्ये घुसले.

१९८९ आणि २००५ पेक्षाही महाभयंकर पूर यावेळी आल्याने २००५ मध्ये जेथे पाण्याची पातळी आली होती. त्यापेक्षाही जादा पाणी शहरात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातही यंदाच्या वर्षी पाणी घुसले. रेड झोनमध्ये झालेल्या बांधकाम क्षेत्रातील अपार्टमेंट, कॉलन्या येथेही मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसले होते.  तसेच गेल्या काही महिन्यापासून पूररेषेबद्दल पाटबंधारे विभागाने दिलेल्या अहवालाची चर्चा सुरू आहे. महापालिकेने यापूर्वी रेड झोनमधील बांधकाम परवाने देताना जी नियमावली तयार केली त्या नियमावलीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. पाटबंधारे विभागाचा नवा अहवाल याबाबतीत महत्त्वाचा ठरणार आहे. 

दरम्यान, यंदा ५ ऑगस्टलाच शहरात महापुराने थैमान घातले. मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांचे नुकसान झाले आहे.या सर्व पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या नगररचना विभागाने जुलै २०१९ पासून रेड झोनमध्ये नव्याने बांधकाम परवाने देणे बंद केल्याकडे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी लक्ष वेधले.

कचरा संकलन आटोक्‍यात 
डॉ. कलशेट्टी म्हणाले, महापुरानंतर शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. हा कचरा महापालिका, बृहन्मुबंई महापालिका, विविध संस्था, कारखाने, विद्यार्थी, विविध स्वंयसेवी संस्था यांच्या मदतीने संकलित करणे शक्‍य झाले आहे. त्यामुळे आठवडाभरानंतर आता शहरातील कचरा आटोक्‍यात आला असून दुर्गंधी पसरणार नाही आणि रोगराई पसरणार नाही, याची दक्षता महापलिका घेत आहे.

शहरात आरोग्य शिबिरे
महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील म्हणाले, शहरात महापुरानंतर रोगराई पसरू नये, यासाठी साफसफाई बरोबरच आरोग्य शिबिरेही मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहेत. ११ नागरी आरोग्य केंद्रामार्फत १६ ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली आहे. विविध प्रकारच्या तपासण्या आणि औषधे नागरिकांना देण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com