मन सुन्न करणारी घटना ; सहा महिन्याच लेकरु झाल पोरकं, वायरमन बापाचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

लिंगनूर उपकेंद्रामध्ये विद्युतपुरवठा बंद करण्यासाठी बराच वेळ फोन केला असता उपकेंद्रातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नाही.

सलगरे (सांगली) : खटाव (ता. मिरज) येथील परीट-यादव जिल्हा परिषद शाळेसमोरील ट्रान्स्फॉर्मर  दुरुस्तीसाठी चढलेल्या कंत्राटी वायरमन श्रीशैल महादेव शिंगाडे (वय २४ ) यांचा शॉक लागून खांबावरच मृत्यू झाला. दरम्यान, मृत वायरमनच्या कुटुंबीयांना महावितरणकडून मदत जाहीर केल्याशिवाय मृतदेह खांबावरून काढण्यास नागरिकांनी जोरदार विरोध केला.  

यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराओ घातला.
याबाबत अधिक माहिती अशी, की खटाव येथील परीट वस्तीमध्ये वीजपुरवठा बंद असल्याची तक्रार आल्याने वायरमन श्रीशैल शिंगाडे हे बंद असलेला विद्युतपुरवठा दुरुस्ती करण्यासाठी सायंकाळी साडेचारच्या सुमारास परीट वस्तीजवळ गेले होते. येथे असलेल्या ट्रान्स्फॉर्मरवर खटाव गावाला विद्युतपुरवठा लिंगनूर उपकेंद्रामधून करण्यात येतो. या उपकेंद्रातून विद्युतपुरवठा बंद न करता सुरू असलेल्या विद्युत ट्रान्सफाँर्मवर चढल्याने कंत्राटी वायरमन श्रीशैल शिंगाडे यांचा विद्युत तारेचा जोराचा शॉक लागून खांबांवरच  मृत्यू झाला.

हेही वाचा -  नागठाणेतील आरोग्य उपकेंद्रात पुरेसे कर्मचारी नाहीत -

वायरमन श्रीशैलना शॉक लागल्याचे समजताच शेजाराच्या लोकांनी आरडा-ओरडा केला; परंतु उच्च दाबाने सुरू असणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे वायरमन श्रीशैल शिंगाडे यांचा मृतदेह ट्रान्सफाँर्मवरच चिकटून राहिला. उच्च दाबाच्या विद्युतपुरवठ्यांमुळे वायरमन श्रीशैलचा मनगटापासून एक हात तुटून खाली पडलेला होता. लिंगनूर उपकेंद्रामध्ये विद्युतपुरवठा बंद करण्यासाठी बराच वेळ फोन केला असता उपकेंद्रातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नाही. मृतदेह चिकटलेल्या अवस्थेतच अर्धा तास वीजपुरवठा सुरूच होता.

महावितरण कंपनीचा भोंगळ कारभारामुळे खटाव येथील श्रीशैल शिंगाडे या कंत्राटी वायरमनच्या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल खटाव येथील ग्रामस्थ करीत आहेत. श्रीशैल शिंगाडे यांचे दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना सहा महिन्याचा एक मुलगा आहे. व वृद्ध आई-वडील अशी कौटुंबिक परिस्थिती असल्याने व वडील वयोवृद्ध झाल्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी श्रीशैल वरच होती. यामुळे घरातील कर्ता माणसाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने व गावातील एक होतकरू तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना घेराओ

दरम्यान, या घटनेतील जबाबदार महावितरणच्या अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी खटाव ग्रामस्थांनी केली आहे. मृत तरुणाच्या कुटुंबीयांना महावितरणकडून योग्य ती मदत जाहीर केल्याशिवाय मृतदेह काढून दिला जात नव्हता. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराओ घातला होता.

हेही वाचा - सहा गावांना मार्चमध्ये मिळणार म्हैसाळचे पाणी -

अनुचित प्रकार घडू नये यांसाठी घटनास्थळी मिरजेचे उपविभागीय पोलिस अधीक्षक प्रकाश विरकर, प्रशिक्षणार्थी वरिष्ठ पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पी.आय.गायकवाड, ए.पी बिले व दंगल नियंत्रण पथकासह पोलिस व सरपंच, उपसरपंच, पोलिसपाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी हजर होते. पोलिस व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: contract basis electricity department employee death for shock in sangli