सुसंवादामुळे आले गुन्हेगारीवर नियंत्रण : वीरेश प्रभू 

परशुराम कोकणे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

बुधवारी प्रभू यांनी नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पदभार सोपविला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सोलापूर : पेट्रोलिंग सोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या समाज घटकांसोबत आम्ही सातत्याने सुसंवाद ठेवला, यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आल्याचे मावळते पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सांगितले. 

बुधवारी प्रभू यांनी नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पदभार सोपविला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांसोबतच नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते. 2016 मध्ये मी सिडनी येथे गेलो होतो, तेथील सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली. त्याप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यश आल्याची प्रभू यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांत कर्मचारी- अधिकाऱ्यांसोबतच नागरिकांची साथ मिळाली. सगळेच माझ्या बाबतीत सकारात्मक होते. मी एकटा काही करू शकलो नसतो, सर्वांच्या सहकार्यामुळे खूप काही करता आले. गेल्या साडेतीन वर्षात पोलिसांबद्दल सकारात्मक भावना निर्माण करण्यात यश आले. 

समाजाचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी पोलिस डॉक्टरांप्रमाणे काम करतात. चुका करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून काहीच उपयोग होत नाही, त्यांच्याशी  गोड बोलून काम करून घेणे महत्त्वाचे असते. अवैध धंद्यावर सातत्याने कारवाई हवीच. पंढरपुरात पोलिसांकरिता हॉलिडे होम्स ही संकल्पना साकारता आली. वारीच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात येणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुक्कामाची चांगली सोय व्हावी म्हणून स्वतंत्र इमारत उभारण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.

आगामी काळात चिंचोळी, एमआयडीसी, जेऊर, जिंती, विडी घरकुल यासह सात ठिकाणी पोलिस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव पाठविला सल्याचे प्रभू सांगितले.

मी स्थापन केलेल्या विशेष पोलिस पथकाने जिल्ह्यातील अवैध धंद्यावर सातत्याने कारवाई करून नियंत्रण आणले आहे. जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यांना स्मार्ट लुक देण्यात यश आले. 19 ठिकाणी अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात आले. कर्मचारी-अधिकाऱ्यांना अधिकाधिक चांगली वैद्यकीय सुविधा दिली. मुख्यालयाच्या जागेवर पेट्रोल पंप उभारल्यामुळे पोलिस कल्याण निधीमध्ये वाढ होत आहे. आगामी काळात वैराग आणि अकलूज येथेही पेट्रोल पंप करण्याचा प्रस्ताव आहे.
- वीरेश प्रभू, मावळते पोलिस अधीक्षक

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Control of Crime because of good communication says Vireesh Prabhu