जैन समाजाप्रमाणे कांदा नाही खाल्ला तर आर्थिक उन्नती; सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे बेताल वक्‍तव्य 

तात्या लांडगे 
सोमवार, 7 मे 2018

शेतमालाचे गडगडलेल्या दरावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी जैन समाजाप्रमाणे कांदा खावू नका, त्यांचा आदर्श घ्या म्हणजे तुमची प्रगती होईल', असे बेताल वक्‍तव्य केले आहे. 

सोलापूर - 'होणारी गारपीट व अवकाळी पाऊस त्यासह अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे आणि बॅंकांकडून पुरेसे कर्ज मिळत नसल्याने खासगी सावकारकीच्या पाशात अडकलेल्या शेतकरी राजाच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतमालाचे गडगडलेल्या दरावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी जैन समाजाप्रमाणे कांदा खावू नका, त्यांचा आदर्श घ्या म्हणजे तुमची प्रगती होईल', असे बेताल वक्‍तव्य केले आहे. 

जैन समाजाची सध्या आर्थिक प्रगती झाली आहे, अनेक जैन समाजातील लोक प्रगतीच्या शिखरावर पाहेचलचे आहेत. माझा दावा आहे की, तुम्हीपण जैन समाजाप्रमाणे कांदा खावू नका मग बघा तुमची आर्थिक प्रगती होते का नाही, असेही श्री. देशमुख यांनी म्हटले आहे. इंदापूरमध्ये सहकारमंत्री देशमुख हे शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत कांदा खरेदी समारंभाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. 

कांदा खाऊन जे रडतात त्यांची प्रगती अद्यापही झालेली नाही. दुसरीकडे कांदा न खाणाऱ्यांची आर्थिक प्रगती मात्र जोरात होत असल्याचे श्री. देशमुख यांनी वक्‍तव्य केले आहे. यापूर्वी विविध प्रकारच्या बेताल वक्‍तव्य सहकारमंत्र्यांनी केली आहेत. आता लोकप्रतिनिंधीसह शेतकऱ्यांकडून त्यांच्या या वक्‍तव्याचा निषेध व्यक्‍त करण्यात येत आहे. 

राज्याच्या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री असताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी असे बेताल वक्‍तव्य करणे त्यांना शोभत नाही, असे विविध लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. या त्यांच्या वक्‍तव्याचा निषेध विधानसभेत केला जाईल, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Cooperation Minister Subhash Deshmukh said disgusting sentence