esakal | भारतातील "चायना बाजार'ला कोरोना संसर्ग 
sakal

बोलून बातमी शोधा

 Corona affected  "China market" in India

"कोरोना'च्या साथीने हैराण असलेल्या चीनमध्ये विविध वस्तूंचे उत्पादन थांबले आहे. त्यामुळे भारतीय बाजारातील आयात थंडावली आहे. मुंबईत होणारी आवक ठप्प आहे. त्याचा परिणाम सांगलीच्या बाजारपेठेवर झाला आहे.

भारतातील "चायना बाजार'ला कोरोना संसर्ग 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः "कोरोना'च्या साथीने हैराण असलेल्या चीनमध्ये विविध वस्तूंचे उत्पादन थांबले आहे. त्यामुळे भारतीय बाजारातील आयात थंडावली आहे. मुंबईत होणारी आवक ठप्प आहे. त्याचा परिणाम सांगलीच्या बाजारपेठेवर झाला आहे. डिसेंबरअखेरपर्यंच्या ऑर्डर येथे आल्या आहेत. आता पुढे ही बाजारपेठ कधी खुली होईल, याचा अंदाज नाही. त्यामुळे होलसेल बाजारात खळबळ उडाली आहे. मुंबईतील स्टॉकिस्टनी चायना आयात मालाचे दर 30 टक्‍क्‍यांची वाढवले आहेत. 

कोरोनामुळे चीनमधील आयातीवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे सांगलीच्या व्यापाऱ्यांनी नोंदवलेली ऑर्डर आता पूर्ण होणार नाही. जे काही साहित्य आता मुंबई दाखल झाले आहे त्याची दरवाढ केल्याने तशी लेबल लावूनच सांगलीत माल येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. भारतीय सण-उत्सवांवर "मेड इन चायना'ची छाप आहे. त्यातून होळी आणि रंगपंचमी सुटली आहे. कारण, त्यासाठी लागणाऱ्या ढोलक्‍या, रंग आणि पिचकाऱ्या नोव्हेंबर महिन्यातच दाखल झाल्या होत्या. आता पावसाळ्यासाठी छत्र्या, शालेय साहित्यात कंपास, पेन यांसह स्टेशनरी साहित्य खरेदी पूर्ण ठप्प झाली आहे. भारतात निर्मिती होणाऱ्या वस्तूंचे दर चीनमधील वस्तूंच्या तुलनेत किमान 20 ते 30 टक्के जास्त आहेत. त्यामुळे बाजारात दरवाढीचे चित्र दिसणार आहे. 

या वस्तूंवर परिणाम 

  • सजावटीचे साहित्य, माळा, हार, कागदी फुले आदी 
  • उत्सवासाठीचे आईस स्प्रे, चायना मोत्यांच्या माळा 
  • डास मारण्यासाठीच्या बॅट, पावसाळ्यात छत्र्या, फुगे 
  • शिलाईसाठी लागणारे चेन, कुंदन, खडे आदी 
  • वाढदिवसासाठी लागणारे साहित्य 

रक्षाबंधन, गणेशोत्सव, दिवाळीवर परिणाम अटळ

भारतीय सण-उत्सवाचा बाजारासाठीच्या वस्तू चीनमधून येतात. होळी व रंगपंचमीच्या साहित्यावर परिणाम होणार नाही, मात्र पुढच्या सहा-आठ महिन्यांतील रक्षाबंधन, गणेशोत्सव, दिवाळीवर परिणाम अटळ आहे.

- घनश्‍याम शोभवाणी 

बाजार थंडावला आणि दरही वाढलेत

सजावटीचे बहुतांश साहित्य चीनमधून आयात होते. आयात थांबली, बाजार थंडावला आणि दरही वाढलेत. स्थानिक ग्राहकांचा आता गैरसमज होतोय की आम्ही मुद्दाम दरवाढ केली. वास्तविक, काही वस्तूंची 30 टक्के तर काहींची 50 टक्‍क्‍यांवर दरवाढ मुंबईतूनच झाली आहे. बाजार थंड असून रोजच रविवार वाटतोय.

- आदित्य विपट