"कोरोना'ची तमाशालाही झाली बाधा, सुपारीच नसल्याने सापडले कात्रीत

आनंद गायकवाड
Friday, 13 March 2020

तालुक्‍यातील समनापूरजवळच्या माळावर दरवर्षी प्रमाणे यंदाही तीन राहुट्या लागल्या आहेत. प्रत्येकी 30 ते 35 कलावंतांचा संच असलेल्या या पार्ट्यांचे मालक आशाळभूतपणे सुपारीची वाट पाहताहेत.

संगमनेर : डिजीटल क्रांतीमुळे जग जवळ आले. मनोरंजनाची साधने, पर्याय, अभिरुची बदलली. कधी काळी राजाश्रय व मोठ्या प्रमाणात लोकाश्रय लाभलेल्या, मनोरंजनातून लोकप्रबोधन, सामाजिक संदेश देण्याचे कार्य करणाऱ्या तमाशासारख्या अस्सल मातीतल्या कलाप्रकाराला काळानुरुप उतरती कळा लागली. ग्रामीण भागातील मनोरंजनाचा बाज बदलला, तरी बदलत्या काळानुसार तमाशानेही हळुहळू बदल स्वीकारला. आपल्या मातीतली लावणी व तमाशा ही लोककला गावोगावच्या यात्रा-जत्राच्या निमित्ताने अद्याप तग धरुन आहे. 

हेही वाचा - खुशखबर, नोकरी भरती होणार अॉफलाईन

कलावंतांची संख्या, साज व साहित्य, यांनुसार तमाशाचे तीन प्रकार पडतात. वर्षातले 215 दिवस चालणारा तमाशा, सुमारे एक ते दीड लाख रुपये सुपारी घेणारा व तिसरा प्रकार मोजक्‍या कलाकारांचा, 50 हजारांपर्यंत सुपारी घेणारा तमाशा. 11 महिने इतर कामधंदे करुन छोट्या तमाशाचे मालक नाशिक, वैजापूर, चांदवड येथून यात्रांच्या काळात कलावंत जमवितात.

खासगी सावकरांकडून व्याजाने पैसे घेऊन कलावंतांना उचल दिली जाते. सध्या रात्री एक वाजेपर्यंतच तमाशा सादर करता येत असल्याने, फार्सिकल वगनाट्य, बतावणी व नाच गाणी पेश केली जातात. कमी बजेटमधील या तमाशाला ग्रामीण भागातून मोठी मागणी असते. 

तालुक्‍यातील समनापूरजवळच्या माळावर दरवर्षी प्रमाणे यंदाही तीन राहुट्या लागल्या आहेत. प्रत्येकी 30 ते 35 कलावंतांचा संच असलेल्या या पार्ट्यांचे मालक आशाळभूतपणे सुपारीची वाट पाहताहेत. साधारणपणे पाडवा ते बुद्धपौर्णिमा या दीड महिन्याच्या कालावधीत मिळालेल्या सुपाऱ्यांवर या कलावंतांचा उर्वरित वर्षभराचा दाणापाणी चालतो.

व्याजाने पैसे घेऊन सुमारे दीड ते दोन लाख रुपयांच्या भांडवलावर उदरनिर्वाहासाठी फड उभा केला जातो. गरजेनुसार प्रतिदिन 10 हजार रुपयाने व्यासपीठ, साऊंड सिस्टीम भाडेतत्वावर घेतली जाते. एका कार्यक्रमाचे महिला कलाकार दीड हजारांपर्यंत मानधन घेतात. कोरोनाच्या संकटामुळे लोककलावंत हवालदिल झाले असून, वर्षभर काय करायचे, असा प्रश्‍न त्यांना भेडसावत आहे. 

मनोरंजन विश्वात लोककला जीवंत ठेवणाऱ्या लोककलाकारांना सध्या वाईट दिवस आले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे कलावंत अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करीत आहेत. यंदा चांगले दिवस येण्याची अपेक्षा असताना, कोरोनाचं नवं संकट आले. प्रशासनाने गावोगाव यात्रा-जत्रांवर निर्बंध आणल्याने तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.

दोन वर्षांपूर्वी अवकाळी पाऊस, मागील वर्षी निवडणूक आचारसंहिता, यांमुळे कार्यक्रम झाले नाहीत. यंदा सारे काही आलबेल वाटत असताना, "कोरोना'चे संकट आले. खेड्या-पाड्यातील सार्वजनिक उत्सव, यात्रा बंद केल्याने, मिळालेल्या सुपाऱ्याही रद्द झाल्या. पुढील सुपाऱ्यांची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. कर्ज फेडायचे कसे, वर्षाचा खर्च कसा भागवायचा, असे अनेक प्रश्‍न आहेत. 
- विलास ऊर्फ राजू गायकवाड, फडमालक, देवठाण, अकोले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Corona": a time of starvation on the spectator artists