कऱ्हाडात कोरोनाचा कहर : एकाच दिवशी सापडले २४ रूग्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

 

कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 56 झाली आहे. तर जिल्ह्यात कोरोनाचे ६९ रूग्ण झाले आहेत. कऱ्हाड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढु लागले आहे.  

 

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची येथील आणखी 12 व मलकापूर येथील दोघांना रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आज (शुक्रवारी) रात्री आलेल्या आरोग्य विभागाच्या तपासणी अहवालातुन समोर आले आहे. रात्री आलेल्या धक्कादायक माहिती मुळे तालुक्याची चिंता अधिकच वाढली आहे. कराड तालुक्यात एकाच दिवशी तब्बल 24 कोरोना बाधित सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 56 झाली आहे. तर जिल्ह्यात कोरोनाचे ६९ रूग्ण झाले आहेत. कऱ्हाड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढु लागले आहे.  

हेही वाचा ः सातारा : पाच आरोग्य सेविका, एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा; पन्नाशीत जिल्हा

बाबरमाची येथे एक रुग्ण सापडला. त्यानंतर तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथे सुरू झालेली कोरोनाबाधितांची साखळी थांबायला तयार नाही. दोन्ही ठिकाणची कोरोना बाधितांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. तेथील रुग्ण सर्वाधिक असल्यामुळे दोन्ही ठिकाणे कोरोनाची हॉटस्पॉटच झाली आहेत. कराड तालुक्यात आज (शुक्रवारी) सकाळच्या टप्प्यात आठ तर सायंकाळच्या टप्प्यात दोन अशा दिवसभरात दहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. 

आवश्य वाचा ः सातारा जिल्ह्यासाठी आजचा शुक्रवार ठरला ब्लॅक फ्रायडे : 11 रुग्ण वाढले

त्यात रात्री आणखी 14 रुग्णांची भर पडल्याची धक्कादायक माहिती उशीरासमोर आली. त्यामध्ये वनवासमाचीतील 12 तर मलकापूर- आगाशिवनगर मधील दोन रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता आणखीच वाढली आहे. सातारा शहरात एक युवक कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले असून आता जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या ६९ वर गेली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus Infected Person Increased In Karad Taluka