Coronavirus : 'आजाराची साखळी तुटू दे, पण आमच्या आधाराची साखळी तुटायला नको' ...

दीपक पवार 
रविवार, 22 मार्च 2020

सध्या सर्वत्र कोरोना या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येकजण याच प्रयत्नात आहे. शासकीय पातळीवरुन देखील खबरदारीच्या उपाययोजना सुरु आहेत.

इटकरे ( सांगली) : 'आजाराची साखळी तुटायला पायजे, पण आधाराची साखळी तुटायला नको' अशी भावना श्रमिक, गोरगरीब, मजुर कुटुंबातून रविवारी उमटली. रोगराईच्या आटकाव्यासाठी संचारबंदीचा प्रसंग जुन्या-जाणत्या बुजुर्गानी पहिल्यांदाच अनुभवला. बाजारपेठेतील व्यवहाराचं चाक थबकले. या फिरत्या चाकावर रोजीरोटी चालवणार्‍या भुमीहीन आणि मजुरांच्या भाकरीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

सध्या सर्वत्र कोरोना या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येकजण याच प्रयत्नात आहे. शासकीय पातळीवरुन देखील खबरदारीच्या उपाययोजना सुरु आहेत. गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठ जवळजवळ ठप्प झालीय. २१ आणि २२ मार्चला तर स्वसंचारबंदी पाळण्यात आली. या कालावधीत शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्ते अक्षरशः भितीदायक जाणवले. अत्यावश्यक कामासाठी रस्त्यावर आलेल्या चार दोन लोकांना ‘ या जगात मी एकटाच उरलोय की काय?’ किंवा ‘ जगाचा र्‍हास तर होत नाही ना? असा भास व्हावा असा शुकशुकाट वाळवा तालुक्याने अनुभवला. अजून पुढे किती काळ ही स्थिती अनुभवावी लागणार आहे, याची अनभिज्ञता सगळीकडे पसरून राहिली आहे.

हेही वाचा- Photo : जगात भारी आम्ही कोल्हापुरी... जनता‌ कर्फ्यूला सन्नाटा...

बाजारपेठेतील व्यवहाराचं चाक थबकले

होरपळून टाकणारे ऊन, निर्मनुष्य रस्ते, बंद घरे, स्मशानशांतता आणि मनात आजाराची भीती या सर्वानी एकट्या जिवाचा थरकाप उडाला. पृथ्वीच्या ह्रासाचा पाश्चात्य भयपट पाहताना अनुभव येत होता. हातावरची पोटं असणार्‍यांना ही भिती जास्तच घाबरवणारी होती. सर्व काही जागच्या जागी थबकल्यानं रोज रस्त्यावर उतरल्याशिवाय पोटाची आणि भाकरीची गाठ न पडणार्‍या लोकांचे हाल सुरु आहेत. नोकरदार मंडळींनी साठवलेल्या शिध्याला हात घातलाय. शेतकर्‍यानं कणग्या आणि पोत्यांकडे नजर टाकलीय; मात्र दिवसभर कमावून तेच रात्री खाणार्‍या लोकांनी करायचं काय? कुणाला हाक मारायची? एरवी या लोकांच्या मदतीला हात देणारा पोशिंदाच आज घरात दारं-खिडक्या बंद करुन बसलाय. तोच आधार अदृश्य आहे. यामुळेच तर परावलंबी गरीब जनता हबकून गेली आहे. अजुन किती दिवस ही स्थिती राहिल याची शाश्‍वती कोणालाच नाही.

चंदेरी नगरीत सन्नाटा...चांदी उद्योगाची चक्रे थांबली...

रात्री खाणार्‍या लोकांनी करायचं काय?

एक दोन दिवसात बाजारपेठेतलं चाक काहीसं फिरायला सुरुवात होईल; मात्र रस्त्यावर हातगाडे लाऊन आणि फिरुन पोटं भरणार्‍यांना अजुनही काही काळ बंद पाळवा लागणार आहेच. शेतमजुर, कष्टकरी, भुमीहिन, बेघर, बांधकाम कामगार, रस्त्यावर हातगाडे लाऊन अथवा फिरुन खाद्यपदार्थ व साहित्याची विक्री करणारे असे सारेच या कोरोनाची लागण न होताच भरडले जात आहेत. अशा परिस्थितीतही हे श्रमिक पोटाला चिमटा काढत परिस्थिती लवकरच सुधारेल, या आशेवर आहेत. संचारबंदी प्रयोगाने 'आजाराची साखळी तुटू दे, पण आमच्या आधाराची साखळी तुटायला नको' अशीच त्यांची भावना आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact Landless and laborer in sangli District sangli marathi news