कोरोना व्हायरस ः संगमनेरात आदेश धुडकावून भरवला बाजार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधीक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे

संगमनेर ः नगर जगाला भेडसावणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी, संगमनेर या तालुक्याच्या शहरात मात्र बेफिकीर नागरिकांकडून अनेक पातळ्यांवर हरताळ फासण्याचा प्रकार सुरु आहे.

शनिवारचा आठवडे बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या धुडकावून आज सकाळी शहरातील नेहरु चौक, घासबाजार परिसरातील गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजी बाजार भरला होता. याची माहिती समजताच नगरपालिका, महसूल विभाग व पोलिसांनी हस्तक्षेप करुन दुपारी बारानंतर बाजार उठवून लावला.

हेही वाचा - दुबईहून आलेले २२ सराफ तपासणी करून घेईनात

संगमनेर शहरात दररोज परिसरातील गावांमधून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी व प्रशासकिय कामासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची संख्या मोठी आहे. कोरोनाचा संभवित प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक बाबी वगळता शहरातील इतर व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले होते. मात्र जीवापेक्षा पैशाला महत्व देणाऱ्या काही व्यावसायिकांनी हा आदेश धुडकावून छुप्या पध्दतीने विक्री सुरु ठेवली होती.

शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी विलास नामदेव गायकवाड ( अकोले नाका ), रोहिदास प्रकाश ढोले ( कासारा दुमाला ) व संपत दत्तात्रय सूर्यवंशी ( अकोले बायपास रोड ) यांच्यावर आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य परिवहन महामंडळाने स्विकारलेल्या धोरणानुसार एसटी.बसच्या काही फेऱ्याही रद्द केल्याने, बसस्थानकावरील गर्दी कमी झाली आहे. तसेच बसमधील प्रवाशीही सुरक्षित अंतरावर बसून प्रवास करीत आहेत. मात्र, बसस्थानकासमोरुन नाशिक पुणे राष्ट्रिय महामार्गावर संगमनेर लोणी श्रीरामपूर मार्गावरील काळ्या पिवळ्या टॅक्सीमधून सर्व वयोगटातील प्रवाशी कोंबून नेले जात आहेत.

विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधीक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सर्वांसाठी महत्वाचे असलेल्या गर्दी टाळण्याकडे अनेकांनी पाठ फिरवली असून, शहरातील विविध ठिकाणी नागरिकांच्या टोळ्या जमल्याचे चित्र पहावयास मिळाले. काही मंदिरेही सताड उघडी होती. दुचाकीवर शहरातील रस्त्यांवर भटकणारे युवक, त्यांच्या टोळ्यांवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता असल्याची चर्चा सुरु आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus The market in Sangamner is not closed