Coronavirus : सातारा : आठही रिपाेर्ट निगेटिव्ह; फिनलॅडहून आलेला युवक रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोना हे राष्ट्रीय संकट असून याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला घ्यावा. 21 दिवासांसाठी जे लॉक डाऊन जाहिर केले आहे, त्याला जनतेने सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

सातारा : कोविड-19 या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील 7 निकट सहवासितांचे तसेच एका 60 वर्षीय महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुनेही एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून हे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 
फिनलॅड येथून प्रवास करुन आलेल्या 32 वर्षीय युवकाला अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.  

सातारा जिल्ह्यातील एका 60 वर्षीय महिलेचा दाेन दिवसांपूर्वी कोविड-19 आजाराचा संसर्ग झालेल्या महिलेशी निकटचा संपर्क आला असल्याने व तिला कोरडा खोकल्याचा त्रास होत असल्याने बुधवारी (ता.25) सकाळी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले हाेते. तिच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला हाेता. 
तसेच  कोविड-19 या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सात निकट सहवासितांचे घशातील स्त्रावाचे नमुनेही एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले हाेते. हे सर्व रिपाेर्ट निगेटिव्ह आले असल्याचे माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली.

राज्यातील जनतेला भाजीपाला मिळेल;भाजीपाला वाहतूक विना अडथळा सुरु राहतील : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील 

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांसाठी लॉक डाऊन जाहिर केलेला आहे. राज्यातील नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुं तसेच भाजीपाला सुरळीतपणे उपलब्ध होत असून यासाठी सहकार व पणन विभाग उपक्रम राबवित आहे, तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

मुंबई तसेच पुणे येथील बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला तसेच अन्नधान्याचे टॅम्पो, ट्रक आलेले आहेत. सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला भाजीपाला मुबलक प्रमाणात मिळावा यासाठी काम सुरु आहे. छोट्या छोट्या गावांमध्ये, प्रभागांमध्ये भाजीपाला नेण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाल्याची विक्री प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, याला जनतेचाही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. तसेच नागरिकांना घरा शेजारी दुकांनमधूनही भाजीपाला उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

तुम्हांला किराणा माल हवा आहे येथे संंपर्क साधा 

मुंबई व पुणे बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा माल येत आहे. पुण्यात 95 ठिकाणी तसेच प्रभागांमधून भाजीपाला विक्री सुरु करण्यात आली आहे. भाजीपाला योग्य त्या प्रमाणात मिळत असून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाजीपाल्याची  वाहतुक तसेच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही  सुट देण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी आपला उत्पादित केलेला माल बाजार समित्यांमध्ये घेऊन जावा.   सातारा जिल्ह्यात  लहान-लहान मंडई सुरु करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे, यामुळे गर्दी नियंत्रणात राहणार आहे. तसाच प्रयोग राज्यात इतरत्रही होत आहे.

Coronavirus : सातारा : त्या तिघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह; होम क्वॉरंटाईनवर गुन्हा दाखल 

आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करा

आरोग्य कर्मचारी घरोघरी जात आहे परदेशातून किंवा परगावाहून आलेल्या नागरिकांनी आपली माहिती या आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावी, असे आवाहनही सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Suspected Eight Citizens Report Received Negative