पंढरपूरच्या माजी नगरसेवकाचा खून पैशाच्या व्यवहारातून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

मिरज - पंढरपूरचा माजी नगरसेवक नामदेव सुरेश भोईटेचा खून पैशाच्या व्यवहारातून झाल्याचे पोलिस तपासात आज निष्पन्न झाले. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी खुनाची कबुली दिली असून, उद्या (बुधवारी) या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. खुनानंतर काही तासांत पोलिसांनी कोल्हापूरजवळील एका धाब्यावर या पाच जणांच्या मुसक्‍या आवळल्या. राजेंद्र दत्तात्रय भिंगे (वय 38), गजेंद्र दिगंबर पवार (33), रवींद्र हरिभाऊ गुरव (37), रावसाहेब संभाजी लोखंडे (28, सर्व रा. पंढरपूर) आणि सचिन नारायण मोहिते (24, रा. सांगोला) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पंढरपूर शहरात "सावकार' आणि "मेंबर' या टोपणनावाने ओळख असलेल्या नामदेव भोईटे (38) याने राजेंद्र भिंगे याच्याकडून काही वर्षांपूर्वी वीस लाख रुपये उसने घेतले होते. यापूर्वीही राजेंद्रने मोठ्या रकमेचे उसनवारीचे व्यवहार नामदेवशी केले होते. त्यामुळे या वेळी हे पैसे राजेंद्रने घरावर कर्ज काढून नामदेवला दिले. कर्ज घेतलेल्या बॅंकेकडून या वीस लाखांच्या वसुलीसाठी कारवाई सुरू झाल्याने रांजेद्र आणि त्याच्या कुटुंबाला त्याचा मानसिक त्रास होऊ लागला. त्यामुळे वारंवार पैसे मागूनही नामदेव पैसे देणे नाकारतही नव्हता आणि देतही नव्हता. त्यामुळे राजेंद्र भिंगेने या चौघांकडे अनेक वेळा आपण पत्नीसह आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचा विचार व्यक्त केला होता. या दोघांच्या व्यवहारात या खुनातील सामील चौघांनीही लक्ष घातले आणि याबाबत राजेंद्रला आत्महत्येपासून परावृत्त केले. तू आत्महत्या करण्याऐवजी नामदेवलाच संपवू, असा सल्ला त्यांनी राजेंद्रला दिला.

शिवाय नामदेवलाही पैसे तातडीने देण्याची विनंतीही केली; पण नामदेवने राजेंद्रप्रमाणेच या चौघांचीही अशीच फसवणूक केली.
नामदेवचा हा बेफिकीरपणा खटकल्याने त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी या पाच जणांनी काल (सोमवारी) रात्री दहाच्या सुमारास नामदेवच्या डोक्‍यात कोयत्याचे वार करून त्याचा खून केला. त्यासाठी या पाच जणांनी अतिशय पद्धतशीरपणे नियोजन केले होते. नामदेव आणि या पाच जणांचा एक मित्र सांगली रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात किडनीच्या विकारावर उपचार घेतो आहे. त्याला भेटण्याचे कारण निश्‍तित करून हे पाच जण आणि नामदेव भोईटे असे सहा जण दोन वाहनांधून दुपारी पंढरपूरहून निघाले. रुग्णालयातील मित्राची भेट घेऊन या सर्वांनी मिरजेतून सव्वानऊ वाजता पंढरपूरसाठीचा प्रवास सुरू केला. याच रस्त्यावर निर्जन ठिकाणी नामदेव भोईटे आणि त्याचा गाडीचालक अशा दोघांनाही ठार करून रस्त्याकडेला टाकून परत पंढरपूर गाठायचे असे या पाच जणांचे नियोजन होते. त्यासाठी एकशे वीस रुपयांना एक या दराने तीन कोयतेही पंढरपुरातच खरेदी करून हल्लेखोरांनी आपल्या गाडीत टाकले होते. गाड्या खरशिंग फाट्यावर येताच लघुशंकेचे निमित्त करून दोन्ही गाड्या थांबविल्या आणि नामदेववर या पाच जणांनी हल्ला करून त्याचा खून केला. या वेळी नामदेवच्या गाडीचा चालक हल्लेखोरांच्या तावडीतून सटकला आणि पळून जाण्यात यशस्वी झाला. थोडे अंतर पळाल्यावर त्याने अंगावरचा पांढरा शर्ट हल्लेखोरांना दिसू नये म्हणून खिशात लपवला आणि झुडुपात आश्रय घेतला. हल्लेखोरांच्या भीताने अद्यापही तो पंढरपूरला परत जाण्याच्या मनस्थितीत नाही.

या हल्ल्यानतंर पाचही जण त्यांच्याकडील गाडी (एमएच 12 जी झेड 2575) घेऊन जतच्या दिशेने पळाले. त्यानंतर विजापूर, बेळगावमार्गे, कोल्हापूरकडे येऊन ते एका धाब्यावर थांबले. या वेळी कोल्हापूर पोलिसांच्या रात्रीच्या गस्त पथकाने त्यांच्या अंगावरील कपड्यांवरून ताब्यात घेऊन मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. या पाचही जणांना उद्या (बुधवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: corporator murder by money transaction