इचलकरंजीतील नगरसेवकांचा राष्ट्रवादीला धडा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

पक्षाच्या चिन्हावर आलेल्या सर्वच नगरसेवकांनी भाजपला मतदान करण्याचा निर्णय घेतला. शंभर टक्के उमेदवारांनी पक्षांतर केल्याने त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाईची शक्‍यता नाही. याची खात्री झाल्यानेच पक्ष नेतृत्वाला काडीचीही किंमत न देता या सात नगरसेवकांनी हा निर्णय घेतला. विशेष म्हणजे श्री. जांभळे स्वतः, त्यांच्या पत्नी व त्यांचा मुलगा नितीन यांचाही यात समावेश आहे. श्री. जांभळे यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीत मात्र खळबळ उडाली आहे. 

कोल्हापूर - पक्षाचा व्हीप झुगारून इचलकरंजी नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी भाजपला साथ दिल्याने कॉंग्रेस आघाडीचे बहुमत असूनही उपनगराध्यक्ष निवडणुकीत मात्र भाजपचे प्रकाश मोरबाळे विजयी झाले. या नाट्यपूर्ण घडामोडीने केवळ इचलकरंजीचेच नव्हे तर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सात नगरसेवकांनी एकावेळी पक्षाच्याविरोधात जाण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. 

इचलकरंजीत राष्ट्रवादी अंतर्गत दोन गट आहेत. एक गट माजी आमदार अशोक जांभळे यांच्या नेतृत्वाखालील तर एक गट मदन कारंडे यांचा आहे. इचलकरंजीत निवडणूकपूर्व जी आघाडी झाली त्यात हे दोन्ही गट कॉंग्रेससोबत राहिले. जांभळे गटाचे उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर रिंगणात उतरले तर श्री. कारंडे यांचे उमेदवार शाहू आघाडीच्या नावाखाली लढले. 

निकालात कॉंग्रेसला 18, श्री. कारंडे यांच्या शाहू आघाडीला 9 तर श्री. जांभळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला 7 जागा मिळाल्या. नगराध्यक्ष निवडणुकीत मात्र या आघाडीचा पराभव करून भाजपच्या सौ. अलका स्वामी विजयी झाल्या.

मात्रउपनगराध्यक्ष निवडीत फारसा फरक पडणार नाही अशी चिन्हे होती. कॉंग्रेस आघाडीचाच उपनगराध्यक्ष होणार या नेत्यांच्या विश्‍वासाला राष्ट्रवादीतील जांभळे गटाने सुरुंग लावत भाजपशी हातमिळवणी केली. गेल्या दोन दिवसांपासून जांभळे गट भाजपासोबत जाण्याच्या बातम्या येत होत्या. त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी रात्रीच व्हीप काढून या सातही नगरसेवकांना उपनगराध्यक्ष निवडीत कॉंग्रेसचे उमेदवार राहुल खंजिरे यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. पण पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सातही नगरसेवकांनी या व्हीपला न जुमानता भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार प्रकाश मोरबाळे यांना मतदान केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. 

Web Title: corporators teach lesson to ncp