भ्रष्टाचार अन्‌ गुंडगिरी संपवली तरच बार्शीचा विकास 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

बार्शी - भ्रष्टाचार आणि गुंडगिरी संपवली तरच बार्शीचा विकास होईल. केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणत राजेंद्र मिरगणेंच्या माध्यमातून बार्शीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप, रासप, रिपाइंच्या उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

बार्शी - भ्रष्टाचार आणि गुंडगिरी संपवली तरच बार्शीचा विकास होईल. केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणत राजेंद्र मिरगणेंच्या माध्यमातून बार्शीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप, रासप, रिपाइंच्या उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

बार्शी शहरातील तानाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. प्रभाग क्रं. 14 मधील भाजपचे उमेदवार रामराजे पवार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन करून नागणे प्लॉटपासून पदयात्रा काढत मंत्री देशमुख तानाजी चौकात आले. या वेळी जाहीर सभेत जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार वासुदेव ढगे, सोलापूरचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, प्र. का. सदस्य राजेंद्र मिरगणे, राजकुमार पाटील, जिल्हा सरचिटणीस धनंजय जाधव, तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील, शहराध्यक्ष आश्‍विन गाढवे, शशिकांत पवार, रासपचे संतोष ठोंगे, रिपाइंचे वीरेंद्र कांबळे, संगमेश्‍वर भडुळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

मंत्री देशमुख म्हणाले, बार्शी शहराचे बकालचित्र मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. निवडणुकांमध्ये विकासकामांवर चर्चा होत नाही. जाहीर सभांत फक्त एकमेकांवर टीका-टिप्पणी होते. निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपये वाटून निवडून आलेले पुन्हा सत्तेतून पैसा मिळवतात. पाच वर्षांत जनतेकडे अजिबात लक्ष देत नाहीत, त्यामुळे बार्शीत गरिबी आहे, बेघर लोक आहेत. येथील सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांचे खरे विरोधक नाहीत. निवडणुका झाल्या, की त्यांच्यामध्ये भागीदारी होते. 60 आणि 40 टक्के कंत्राटकामे वाटून घेतली जातात. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी नाव न घेता केला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार ऍड. वासुदेव ढगे यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका करत भाजपच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. नगरसेवकपदाच्या उमेदवार कांचन गुंड, रासपचे संतोष ठोंगे, प्रा. संगमेश्‍वर भडुळे, वीरेंद्र कांबळे यांनीही मनोगते व्यक्‍त केली. 

"तर मत मागायला येणार नाही...' 

येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत भाजपला संधी दिल्यास शहरातील सर्वच बेघरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्‍की घरे देण्यात येतील, हे केवळ आश्‍वासन नाही, गरिबांना पक्‍की घरे न मिळाल्यास पुढील विधानसभेला मी लोकांसमोर मते मागायला येणार नाही, असे राजेंद्र मिरगणे यांनी जाहीर केले. 

Web Title: Corruption and bullying consume only development Barshi