भ्रष्टाचारमुक्त पोलिस सेवेत अाणण्याचे प्रयत्न - विश्‍वास नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

सांगली - पोलिस दल एक्‍स्पर्ट आणि टेक्‍नोसॅव्ही होत आहे. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पोलिस जनतेच्या सेवेसाठी असावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी येथे केले.

सांगली - पोलिस दल एक्‍स्पर्ट आणि टेक्‍नोसॅव्ही होत आहे. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पोलिस जनतेच्या सेवेसाठी असावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी येथे केले.

पोलिसांना पॉस मशिन आणि ब्रेथ ॲनालायझर मशिन वितरण करण्याचा कार्यक्रम वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टिळक हॉलमध्ये आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे अधीक्षक अभियंता अरुणकुमार खोत, कोल्हापूरचे अप्पर  अधीक्षक हर्ष पोतदार, उपाधीक्षक धीरज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. पोलिसांचे मनुष्यबळ वाढवणे कठीण आहे. त्यामुळे पोलिसांनी कौशल्य आत्मसात करणे आणि टेक्‍नोसॅव्ही पोलिस हे धोरण आहे. सर्व जिल्ह्यात सायबर लॅबची उभारणी हा त्याचाच भाग आहे. सीसीटीव्ही कॅमेरे हे पोलिसाप्रमाणे दिवस-रात्रपाळीत कार्यरत राहिले तर पोलिसांना तपासात मदत होईल. पोलिसांना ब्रेथ ॲनालायझर मशिन आज दिली आहेत. ती पडून राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. हायवे बीट ही संकल्पना अमलात आणली आहे. महामार्गावर अवैध धंदे बंद करण्यासाठी ही संकल्पना आहे. आता न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गावर दारू दुकाने बंद राहतील याची अंमलबजावणी करावी. त्यामुळे अपघात कमी होतील. ‘पॉस’ मशिनमुळे पोलिसांना दंड गोळा करणे सोपे बनेल. भ्रष्टाचाराला आळा बसेल. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पोलिस जनतेच्या सेवेत असतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपघाती मृत्यू हा चिंतेचा विषय आहे. दारू पिऊन वाहन चालवून अपघात केल्यानंतर त्यामध्ये कोणी मृत झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच जखमी झाल्यास सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न म्हणून कलम ३०८ नुसार गुन्हा दाखल करावा.’’

अधीक्षक शिंदे म्हणाले, ‘‘पोलिस दलातील सांगली व मिरज वाहतूक नियंत्रण शाखेसाठी प्रत्येकी चार याप्रमाणे आठ पॉस मशिन्स आणि पोलिस ठाण्यासाठी सात मशिन्स याप्रमाणे एकूण १५ मशिन्स उपलब्ध करून दिले आहेत. कॅशलेसच्या दृष्टीने हे पाऊल उचलले  आहे. एका स्वॅपमध्ये दंडाची रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. वाहतूक नियमन हे सातत्याने करण्याची  गरज आहे. ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेससाठी ब्रेथ ॲनालायझर मशिन्स उपयोगी आहेत. मशिन्समध्ये फोटो, रीडिंग आणि प्रिंटची सुविधा आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन मशिन्स आणि वाहतूक शाखेकडे पाच मशिन्स दिली जातील. नाकाबंदी आणि तपासणीवेळी त्याचा वापर केला जाईल. दारू पिऊन वाहन चालवणे अशक्‍य केले तर अपघात टळतील.’’ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पॉस आणि ब्रेथ ॲनालायझर मशिनचे वितरण करण्यात आले. पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि वालचंद अभियांत्रिकीचे विद्यार्थी उपस्थित होते. उपाधीक्षक धीरज पाटील यांनी आभार मानले.

Web Title: corruption free police service