इचलकरंजीत सुताचे कोन खाक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

इचलकरंजी - येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमधील एका सूत गोदामाला पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत सुमारे 28 कोटी रुपयांचे सुताचे कोन जळून खाक झाले. जळालेले सुताचे कोन शहरातील अनेक कारखानदारांचे होते. जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या अकरा गाड्यांनी आग आटोक्‍यात आणली.

इचलकरंजी - येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमधील एका सूत गोदामाला पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत सुमारे 28 कोटी रुपयांचे सुताचे कोन जळून खाक झाले. जळालेले सुताचे कोन शहरातील अनेक कारखानदारांचे होते. जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या अकरा गाड्यांनी आग आटोक्‍यात आणली.

शहरातील गोवर्धन व्यास यांनी येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये रामकुंज वेअर हाऊस या नावाने बारा हजार स्क्वेअर फुटांचे सुताचे गोदाम बांधले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जुगल किशोर तिवाडी व त्यांच्या मित्रानी हे गोदाम भाडे तत्त्वावर घेतले आहे. गोदामात शहरातील काही कारखानदारांचे कोट्यवधीचे सुताचे कोन ठेवले होते. गोदामास मध्यरात्री अचानक आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण करून गोदामास घेरले. आगीची कल्पना शेजाऱ्यांनी गोदामाच्या मालकासह ते भाड्याने घेतलेल्या कारखानदारांना आणि नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली.

पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या. पण आगीने धारण केलेल्या रौद्र अवतारापुढे पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न तोकडे पडू लागले. त्यामुळे आग विझविण्यासाठी कुरूंदवाड, जयसिंगपूर या दोन नगरपालिकेसह कोल्हापूर व सांगली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण केले.

घटनास्थळी अकरा पाण्याच्या गाड्या दाखल झाल्या. तरी देखील आग नियंत्रणात येण्याचे चित्र दिसेना. अखेर अकरा पाण्याच्या गाड्यांनी शंभरहून अधिक पाणी भरून आणण्याच्या फेऱ्या करीत, तब्बल साडेचार तासांच्या कालावधीनंतर आज सकाळी आग आटोक्‍यात आणण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

आगीची दाहकता इतकी मोठी होती की गोदामाच्या स्लॅब, भिंतीना तडे जाऊन संपूर्ण गोदाम मोडकळीस आले आहे. तर गोडावूनवरील लोंखडी कैच्या (अँगल) वितळल्या. आगीमुळे गोदामात ठेवलेले शहरातील कारखानदारांचे सुमारे 28 कोटींचे सुताचे कोन जळून खाक झाले. जळालेले सुताच्या कोनाचा वास आज दुपारपर्यंत खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये दरवळत होता. याचबरोबर आगीचे लोट दोन किलोमीटर अंतरावरून दिसत होते. आग विझविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना वसाहतीमधील नागरिकांनी मदत केली. तसेच या गोदामास आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही.

Web Title: cotton godown fire