esakal | पांढरं सोनं पिकवलंय, का मातीमोल विकू?... 

बोलून बातमी शोधा

Cotton purchase of Rs 147 crore at Shegaon

शेवगाव तालुका पांढऱ्या सोन्याचे आगार म्हणून ओळखला जातो. सरकी वेगळी करून कापसाच्या गाठी बनविणाऱ्या जिनिंग-प्रेसिंग उद्योगाने जम बसविला आहे. सरकीपासून तेल व पेंडनिर्मितीसाठीही "ऑइल मिल' कार्यरत आहे. त्यातून अनेकांच्या हातांना काम मिळाले. 

पांढरं सोनं पिकवलंय, का मातीमोल विकू?... 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेवगाव : केंद्र सरकारचे भारतीय कपास निगम, राज्य सरकारची कापूस एकाधिकार योजना व खासगी जिनिंग व्यावसायिकांमार्फत सुमारे दोन लाख 78 हजार 496 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्यातून तब्बल 145 कोटी तीन लाख 29 हजार 759 रुपयांची उलाढाल झाली. 


शेवगाव तालुका पांढऱ्या सोन्याचे आगार म्हणून ओळखला जातो. सरकी वेगळी करून कापसाच्या गाठी बनविणाऱ्या जिनिंग-प्रेसिंग उद्योगाने जम बसविला आहे. सरकीपासून तेल व पेंडनिर्मितीसाठीही "ऑइल मिल' कार्यरत आहे. त्यातून अनेकांच्या हातांना काम मिळाले. 


केंद्र सरकारनेही एक नोव्हेंबरपासून सी.सी.आय.मार्फत येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले. जागेची अडचण आल्याने सी.सी.आय.ने शहरातील पाच व बालमटाकळी येथील एका जिनिंगमध्ये कापूस खरेदी केला. जिल्ह्यातील हे एकमेव खरेदी केंद्र असल्याने, जिल्ह्यातील व बाहेरील सहा हजार शेतकऱ्यांकडून 19 फेब्रुवारीपर्यंत एक लाख 11 हजार 973 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांना क्विंटलला सरासरी पाच हजारांवर भाव मिळाला. त्यातून शेतकऱ्यांना सुमारे 60 कोटी 24 लाख 14 हजार 740 रुपये मिळतील. कापूस साठविण्यासाठी गोदाम उपलब्ध नसल्याने सध्या खरेदी थांबविली आहे. 


राज्य सरकारने "नाफेड'मार्फत चापडगाव येथे 51 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली. त्यातून 27 कोटी 43 लाख 80 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या खरेदी केंद्रांमुळे खासगी व्यावसायिकांनाही त्या तुलनेत पाच हजार रुपयांच्या आसपास भाव द्यावा लागला. त्याचाही शेतकऱ्यांना फायदा झाला. अद्याप अनेकांकडे कापूस शिल्लक आहे. सी.सी.आय.ने केंद्र बंद केल्यास खासगी व्यापारी भाव पाडून कापसाची खरेदी करतील. त्यामुळे हे केंद्र सुरू ठेवण्याची मागणी बाजार समितीचे सभापती अनिल मडके, सचिव अविनाश म्हस्के यांनी केली आहे. 
शहरासह तालुक्‍यातील 11 खासगी व्यापाऱ्यांनी सुमारे एक लाख 15 हजार 523 क्विंटल कापसाची खरेदी केली. त्यातून सुमारे 57 कोटी 76 लाख 15 हजार रुपयांची उलाढाल झाली. 

जागेची अडचण असूनही सी.सी.आय.ने मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला. गोदाम उपलब्ध नसल्याने व उन्हाची तीव्रता वाढल्याने सध्या खरेदी थांबविली आहे. मात्र, शिल्लक कापसाचा विचार करता, आणखी काही दिवस केंद्र सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. 
- शिवाजी पंडित, प्रभारी, भारतीय कपास निगम (सी.सी.आय.) 

सरकारने वेगवेगळ्या खासगी जिनिंगच्या माध्यमातून कापसाची खरेदी केली. त्यामुळे सरकी वेगळी करून गाठी बनविण्यासाठी मजूर व मशिनचा वापर झाला. त्यामुळे काही प्रमाणात या व्यवसायाला संजीवनी मिळाली. 
- पुष्पक धूत, हनुमान जिनिंग