कोरोनाचे संकट मात्र गणेश भक्त उत्साहीत ; विसर्जन साधेपणानेच

मिलिंद देसाई
Tuesday, 1 September 2020

विसर्जन साधेपणाने पण उत्साह कायम, गर्दीने रस्ते फुलले 

बेळगाव : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी बेळगाव शहर आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून सकाळ पासूनच विसर्जन तलावांवर गर्दी झाली आहे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लवकर विसर्जन करण्यास प्राधान्य दिले आहे. ढोल ताशा किंवा इतर वाद्यांचा गजर नसला तरी गणेश भक्तांचा उत्साह मात्र कायम आहे. 

दरवर्षी दुपारी 4 नंतर हुतात्मा चौक येथून विसर्जन मिरवणुकीस सुरवात होते. त्यानंतर  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. मात्र यावेळी मिरवणूक रद्द करण्यात आल्याने मंडळांच्या मूर्ती सरळ विसर्जन तलावांवर जात आहेत तसेच मूर्ती लहान असल्याने काही वेळातच विसर्जन पार पडत आहे. भातकांडे गल्ली येथील मंडळाने सर्व प्रथम विसर्जन केले तर त्यांनतर शास्त्रीनगर, कुलकर्णी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौकातील मूर्तिचे विसर्जन करण्यात आले असून आता पर्यंत 10 हुन अधिक मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे. कपिलेश्वर येथील नवीन तलावात मोठ्या मूर्तींचे तर जुन्या तलावात लहान मुर्तीचे विसर्जन केले जात आहे.

हेही वाचा- चिनी ॲपला बंदी मात्र भारतीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात या अडचणी

सरकारी नियमांचे पालन करून मंगळवारी होत असणाऱ्या श्री विसर्जनामुळे पोलिस बंदोबस्ताचे प्रमाण काहीसे  कमी होते. मात्र तरी देखील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस फाटा सज्ज होता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी कपलेश्वर तलाव आणि कपिलतीर्थ येथे झालेल्या  विसर्जनाची पाहणी पोलीस आयुक्त सीमा लाटकर यांनी केली. विसर्जन सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस पथकाने  पुरेपूर दक्षता घेतली आहे. विसर्जन करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. त्यामुळे कोरिनाचे संकट असले तरी गणेश भक्तांचा ओसंडून वाहत आहे.

संपादन -  अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid impact but karnataka people enjoying ganesha festival in belguam