सीपीआरमध्ये २४ तास बंदोबस्त - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहूमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात पोलिस दलाकडून २४ तास पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. दरम्यान, रुग्णालय परिसरातील अतिक्रमणे १ एप्रिलपर्यंत काढून टाकावीत, असे आदेशही त्यांनी रुग्णालय प्रशासन, पोलिस यांना दिले. 

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहूमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात पोलिस दलाकडून २४ तास पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. दरम्यान, रुग्णालय परिसरातील अतिक्रमणे १ एप्रिलपर्यंत काढून टाकावीत, असे आदेशही त्यांनी रुग्णालय प्रशासन, पोलिस यांना दिले. 

राजर्षी छत्रपती शाहूमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची बैठक आज रुग्णालयाच्या सभागृहात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस आमदार अमल महाडिक, समितीचे सदस्य महेश जाधव, अजित गायकवाड, शीतल रामगुडे, डॉ. सुरेखा बसरगे, डॉ. इंद्रजित काटकर, डॉ. अजित लोकरे, सुनील करंबे, सुभाष रामगुडे यांच्यासह महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, राजीव गांधी योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील यांच्यासह सर्व संबंधित सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘‘उद्यापासून सीपीआर रुग्णालयात २४ तास पोलिस बंदोबस्त राहील, तसेच अपघात विभागात रुग्ण तपासणीसाठी आणताना रुग्णाबरोबर फक्त दोनच नातेवाइकांना प्रवेश दिला जाईल. तर कक्षामध्ये आंतररुग्ण म्हणून असणाऱ्या रुग्णाच्या एका नातेवाईकास प्रवेश दिला जाईल. यासाठी आवश्‍यक असणारी पासची सुविधा तसेच रुग्णाला भेटण्याची वेळ तत्काळ निश्‍चित करावी.’’

सीपीआर आवारातील अतिक्रमणे १ एप्रिलपर्यंत संबंधितांनी स्वत:हून काढण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाने द्याव्यात; अन्यथा २ एप्रिल रोजी आवारातील १४ अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी दिले. सीपीआरमध्ये सीटी स्कॅन कार्यान्वित करण्यात आले असून ट्रॉमा युनिट प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. या दोन्ही सुविधा लवकरच आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कायमस्वरुपी सुरू केल्या जातील, तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत आरोग्यमंत्र्यांसमवेत चर्चा घडवून आणली जाईल, असेही या बैठकीत ठरले. 

‘जीवनदायी’त ६८ हजारांवर उपचार
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२ रुग्णालयांचा समावेश असून जिल्ह्यातील ६८ हजार ७९० रुग्णांना लाभ दिला आहे. यामुळे १७७ कोटी ८० लाखांचा जिल्ह्यातील रुग्णांचा फायदा झाल्याचे सांगण्यात आले.

बैठकीतील निर्णय असे
सीपीआरमध्ये २४ तास पोलिस बंदोबस्त
ॲडमिट रुग्णासोबत एकाच नातेवाईकाला परवानगी
रुग्णांना भेटण्याच्या वेळा निश्‍चित होणार 
नातेवाइकांना पास देणार
डॉक्‍टर, नातेवाइकांची वाहने वेगवेगळ्या ठिकाणी
बॅरेकेटिंग लावून वाहनांची पार्किंग सुविधा

Web Title: cpr hospital 24 hrs. police bandobast