आत्महत्येप्रकरणी कुरुकलीच्या सैनिकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुरगूड - येथील स्नेहल राजाराम तोडकर हिने केलेल्या आत्महत्येस कुरुकली (ता. कागल) येथील दशरथ उर्फ निखिल कृष्णात चौगले हा सैनिक कारणीभूत असल्याची फिर्याद स्नेहलचे वडील राजाराम तोडकर यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी सैनिक चौगलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुरगूड - येथील स्नेहल राजाराम तोडकर हिने केलेल्या आत्महत्येस कुरुकली (ता. कागल) येथील दशरथ उर्फ निखिल कृष्णात चौगले हा सैनिक कारणीभूत असल्याची फिर्याद स्नेहलचे वडील राजाराम तोडकर यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी सैनिक चौगलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

स्नेहल व दशरथ दोघेही २०१४ साली कॉलेजमध्ये शिकताना त्यांचे प्रेमसंबंध जुळले. स्नेहलच्या नातेवाइकांनी त्याला विरोध केला; मात्र २०१५ मध्ये दशरथने आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यासह घरी येऊन स्नेहलसाठी लग्नाची बोलणी केली. थोरला भाऊ समीरचे वर्षभरात लग्न झाल्यानंतर विवाह करण्याचे त्याने सांगितले. त्यामुळे दोघेही फोनवरून संपर्कात होते. दशरथ भरती झाल्यानंतर सैन्यदलातील शपथविधी कार्यकमास स्नेहलही उपस्थित होती. काही दिवसांनंतर मात्र दशरथ व त्याचे कुटुंबीय स्नेहलची उंची कमी व नकली दात असल्याचे कारण सांगून टाळू लागले.

तसेच ‘तू आता माझा विचार सोड’ असे दशरथने फोनवरून सांगितल्याने स्नेहल अस्वस्थ होती. ३० नोव्हेंबर रोजी शिंदेवाडीच्या सरपिराजीराव तलावावर दोघांची भेट झाली. तेेव्हा दोघांत वाद झाला. त्यावेळी दशरथने स्नेहलला मारहाण केली होती. तिच्या नातेवाइकांनी दशरथच्या घरी सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनीही लग्नाबाबत टाळाटाळ केली. यामुळे स्नेहल  मानसिक तणावाखाली गेली व त्यातूनच मंगळवारी (ता.११) घरी कोणी नसल्याचे पाहून तुळईला ओढणी बांधून आत्महत्या केली. 

आत्महत्येची वर्दी मुरगूड पोलिसांत स्नेहलचे वडील राजाराम तोडकर यांनी दिली होती. ३०६, ४२० आणि ३४ कलमान्वये दशरथवर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे अधिक तपास करीत आहेत. 

दोघांचेही संभाषण रेकॉर्ड
स्नेहलचा मोबाईल तपासला असता आत्महत्येपूर्वी दशरथ व स्नेहलचे बोलणे झाल्याचे आढळून आले. दोघांतील वादातूनच तिने टोकाचा निर्णय घेतला, असे वडील राजाराम तोडकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Crime against the Kurukali soldier for suicides