पैसे देऊन काम करून घेण्याची भाषा येणार अंगलट

सुधाकर काशीद
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - लाच घेतल्याशिवाय काम करणारी जशी एक प्रवृत्ती आहे, तशी पैसे फेकून कोणतेही काम करून घेतो, असे म्हणणारी दुसरी प्रवृत्ती आहे. किंबहुना पैसे देऊन काम करून घेणाऱ्या काही घटकांनीच शासकीय यंत्रणेला पैशाची चटक लावली आणि त्याची झळ सर्वांना बसू लागली आहे. 

मात्र, शासकीय यंत्रणेतला जर कोणी आपल्या सेवेचे इमान जपण्यासाठी पुढे आला तर देण्याची भाषा करणाऱ्यांच्या हातात बेड्या पडू शकणार आहेत. आज एका पोलिस उपनिरीक्षकाने हे करून दाखवले आहे; पण खरोखरच जर इतरांनीही ठरवलं तर पैशाच्या जोरावर काम करून घेण्याची भाषा करणाऱ्यांची हवा टाईट होऊ शकणार आहे. 

कोल्हापूर - लाच घेतल्याशिवाय काम करणारी जशी एक प्रवृत्ती आहे, तशी पैसे फेकून कोणतेही काम करून घेतो, असे म्हणणारी दुसरी प्रवृत्ती आहे. किंबहुना पैसे देऊन काम करून घेणाऱ्या काही घटकांनीच शासकीय यंत्रणेला पैशाची चटक लावली आणि त्याची झळ सर्वांना बसू लागली आहे. 

मात्र, शासकीय यंत्रणेतला जर कोणी आपल्या सेवेचे इमान जपण्यासाठी पुढे आला तर देण्याची भाषा करणाऱ्यांच्या हातात बेड्या पडू शकणार आहेत. आज एका पोलिस उपनिरीक्षकाने हे करून दाखवले आहे; पण खरोखरच जर इतरांनीही ठरवलं तर पैशाच्या जोरावर काम करून घेण्याची भाषा करणाऱ्यांची हवा टाईट होऊ शकणार आहे. 

कोल्हापुरात याची या क्षणी फार गरज आहे. कारण काही ठरावीक जणांनी आपली बेकायदेशीर कामे करून घेण्यासाठी स्वतंत्र ‘भांडवलाचीच’ तरतूद केली आहे. याच्या तोंडावर एवढे पैसे फेकले, त्याला तेवढे पैसे घरपोच केले, त्याला इंपोर्टेड दारू पाजली, त्याला फाइव्ह स्टारला खायला घातले, याला अंगठी दिली, त्याला सोन्याचे कडे दिले असली त्यांची भाषा आहे. 

शासकीय यंत्रणा आपल्या पैशावर नाचते असल्या मग्रुरीची त्याला जोड आहे. त्यांनी अनेक किचकट कामे पैशाच्या बळावर करून घेऊन आता शासन यंत्रणेलाही अडचणीत आणले आहे; पण खरोखर एखादा खमका अधिकारी किंवा कर्मचारी पुढे येण्याची गरज आहे आणि त्याने पैशाची भाषा करणाऱ्यांना पकडून देण्याची आवश्‍यकता आहे.  

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यात जसा लाच घेणे गुन्हा आहे; तसा काम करून घेण्यासाठी लाच देणे हा देखील गुन्हा आहे. जसे लाच घेताना पकडता येते तसे या कायद्यातील तरतुदीनुसार लाच देणाऱ्यालाही पकडून देता येते. जशी लाच घेण्याची काही जणांना सवयच असते, तशी लाच देऊन काम करून घेण्याचीही अनेकांना सवय असते. बहुतेक ठिकाणी हे व्यवहार दोन्ही बाजूंच्या संमतीने होत असतात; पण लाच देऊन कामे करून घेणारे शासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक माणसाला आपण विकत घेऊ शकतो व वाट्टेल ते काम करून घेऊन शकतो, अशी भाषा करत असतात.

शासकीय, निमशासकीय यंत्रणेत भ्रष्टाचार असला तरी या यंत्रणेतला प्रत्येक माणूस भ्रष्टाचारी नाही; हे वास्तव आहे. या यंत्रणेतले अनेक जण कोणाचा कपभर चहाही न घेता काम करत असतात. एखादे काम होणार नसेल तर हे काम बेकायदेशीर आहे; ते आपल्याकडून होणार नाही, असे सांगत असतात आणि लाच देऊन कामे करून घेणाऱ्यांच्या दृष्टीने अशी प्रामाणिक माणसेच मोठी अडचणीची असतात. त्यामुळे आपले काम करून घेण्यासाठी हे लोक वेगवेगळी आमिषे दाखवत असतात. उगीचच अमूक एका देवाचा प्रसाद तुमच्यासाठी आणला आहे. म्हणून मिठाई अंगारा घेऊन येत असतात. अशा लोकांना पकडून देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तरतूद आहे. पैसे घेऊन काम करून द्या, असे म्हणणाऱ्याचा फोन टेप करून तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करावा लागतो व आपली इच्छा नसतानाही अमूक एक व्यक्ती आपल्याला काम करून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळी आमिषे दाखवत आहे, त्यावर कारवाई करावी असा अर्ज द्यावा लागतो. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून सापळा रचला जातो व लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल होतो.
लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम सात व बारानुसार अशा पद्धतीने लाच देणाऱ्यास पाच महिने ते पाच वर्षे शिक्षेची व दंडाची तरतूद आहे आणि प्रमाणिक सरकारी, निमसरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनात आणलं, तर लाच देणाऱ्यांना पकडून देणे सोपे आहे. आज एका पोलिस उपनिरीक्षकाने वकिलाला पकडून देऊन हे करून दाखवले आहे. इतरांनीही पुढे येऊन अशी जरब बसवण्याची गरज आहे. 

‘पुलोद’ राजवटीत झाली होती कारवाई
‘पुलोद’ राजवटीच्या काळात तत्कालिन गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांनी त्याची कल्पना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली व भाई वैद्य यांच्या बंगल्यात येऊन लाच देण्याची भाषा करणाऱ्यावर त्यावेळी कारवाई झाली.

Web Title: crime on bribe people