ATM फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; 53 लाखांचा डल्ला हुकला, कुडचीतील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ATM फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; 53 लाखांचा डल्ला हुकला

ATM फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; 53 लाखांचा डल्ला हुकला

रायबाग : येथील रेल्वे स्थानकानजीक नगर परिषदेच्या (corporation of raibag) कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या स्टेट बँकेचे दोन एटीएम (state bank ATM) फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र चोरट्यांच्या हाती काहीही न लागल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. गुरुवारी (ता. २०) रात्री बारा ते तीन या कालावधीत घडलेली घटना शुक्रवारी (ता. २१) सकाळी उघडकीस आली. दोन्ही एटीएम न खुलल्याने त्यामधील तब्बल 53 लाखांवरील चोरट्यांचा डल्ला हुकला आहे. (crimecase) या घटनेमुळे शहरात दिवसभर खळबळ उडाली. कुडची पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कुडची येथील नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गाळ्यात स्टेट बँकेचे एटीएम सेंटर आहे. त्यामध्ये दोन एटीएम मशीन आहेत. एका मशीनमध्ये 27 लाख तर दुसऱ्या मशीनमध्ये 26 लाख अशी ५३ लाखांची रोकड होती. या सेंटरवर दिवसभर सिक्युरिटी गार्ड असतो. मात्र रात्री नसल्याने चोरट्यांचे फावले. लॉकडाउन व रात्रीची वेळ असल्याने शांत वातावरण होते. गुरुवारी (ता. २०) रात्री १२ ते ३ या वेळेत 40 ते 50 वयोगटातील चार-पाच चोरट्यांच्या टोळीने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. ते सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. पण मंकी कॅप असल्याने चेहरे दिसून येत नाहीत. त्यांच्या हालचालींवरून ते सराईत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: सावधान! बेशिस्तपणे कचरा फेकाल तर फेसबुकवर दिसाल

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या कामात प्रशासनासह पोलिस खाते व्यस्त आहे. त्याचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळीने कुडची येथे एटीएम फोडण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे पोलिसांसमोरील डोकेदुखी वाढली आहे. नागरिक आधीच कोरोनाच्या भीतीखाली आहेत. त्यातच ही घटना घडल्याने नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. कुडची पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक शिवराज दरीगौड व सहकारी अधिक तपास करत आहेत.

चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान

सीसीटीव्हीत कैद झालेल्या चित्रणाचा कसून तपास करून चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सध्या लॉकडाउन व बंदोबस्तामुळे पोलिसांना वेळ कमी मिळत आहे. त्यातून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

हेही वाचा: एका रात्रीतल्या श्रीमंतीनं गडबडून गेलेला खेळाडू

loading image
go to top