परिवहन समिती सभापती चव्हाण यांच्यावर गुन्हा

परिवहन समिती सभापती चव्हाण यांच्यावर गुन्हा

कोल्हापूर - उद्धट वर्तन केल्याच्या गैरसमजातून महापालिकेचे परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण यांनी शाहूपुरी ठाण्याकडील अधिकाऱ्याला धक्काबुक्की व शिवीगाळ केली. व्हिनस कॉर्नर येथील हॉटेलमधील वाद मिटवताना रविवारी रात्री प्रकार घडला. 

या प्रकरणी राहुल सुभाष चव्हाण (शाहूपुरी दुसरी गल्ली) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. वादाचा हा सर्व प्रकार सेफ सिटीअंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद आहे. 

शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी - व्हिनस कॉर्नर चौकातील हॉटेल व्हिनस येथे रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास शहरातील एका मंडळाचे कार्यकर्ते हुल्लडबाजी करत आले. हॉटेल व्यवस्थापक व कामगारांकडे जेवणाची मागणी केली. जेवण संपल्याचे कामगारांनी सांगितले. यावर कार्यकर्त्यांनी वाद घालायला सुरवात केली. कामगारांना धक्काबुक्की केली. आवाज ऐकून नागरिक जमा झाले. वाद वाढत जाताच काहींनी पोलिसांना कळविले.

उपनिरीक्षक सचिन पांढरे घटनास्थळी आले. याच दरम्यान स्थानिक नगरसेवक आणि परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण सहकार्यांसह तेथे आले. पोलिस व चव्हाण यांच्या मध्यस्थीने वाद मिटला. या नंतर कार्यकर्ते निघून गेले. चव्हाण त्यांच्या कार्यकर्त्यांसह चौकातच थांबून असल्याने गर्दी वाढत होती. गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने पांढरे यांनी चव्हाण यांना तुम्ही येथून जा, गर्दी कमी होईल, असे सांगितले. यावेळी पांढरे यांनी उद्धट वर्तन केल्याच्या गैरसमजातून चव्हाण यांनी पांढरे यांना अश्‍लील शिवीगाळ केली. त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी थेट पांढरे यांच्या अंगावर धावून जात धक्‍क्‍बुक्की केली. अखेर कार्यकर्त्यांनी चव्हाण यांची समजूत काढत त्यांना तेथून बाजूला नेले. 

या बाबत पांढरे यांनी फिर्याद दिली. राहुल चव्हाण यांच्यावर सरकारी कामात अडथला आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला. चव्हाण यांनी कारवाई होऊ नये, यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केले. 

दिवसभर शोध मोहीम
राहुल चव्हाण यांना ताब्यात घेण्यासाठी शाहूपुरी पोलिस आज सकाळी चव्हाण यांच्या शाहूपुरीतील घरी गेले होते; मात्र ते मिळून आले नाहीत. तेथून पोलिस महापालिकेत गेले. पथक महापालिकेच्या आवारात थांबून होते. चव्हाण सुद्धा महानगरपालिकेतच थांबून होते. अखेर त्यांनी तेथून पोलिसांना चकवा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com