साक्षीदार फितूर होऊनही आरोपीला सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडितेचे कुटुंबीय आणि सर्व साक्षीदार फितूर होऊनही अक्षय हरीदास बोबडे (वय 26, रा. राहोटी, ता. उत्तर सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

सोलापूर - बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडितेचे कुटुंबीय आणि सर्व साक्षीदार फितूर होऊनही अक्षय हरीदास बोबडे (वय 26, रा. राहोटी, ता. उत्तर सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

आरोपी अक्षय हा अल्पवयीन मुलीचा ऑक्‍टोबर 2016 पासून पाठलाग करीत होता. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ती मानसिक तणावाखाली होती. 15 जानेवारी 2017 रोजी मुलीने "मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही...' अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले.

फिर्यादी, पीडितेचे कुटुंबीय व काही महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. परंतु, वैद्यकीय अधिकारी व पंच तसेच तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक जे. एस. साळुंखे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अक्षयला अत्याचार प्रकरणात दहा वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्‍क्‍म न भरल्यास एक महिना साधी शिक्षा भोगण्याचा आदेश दिला आहे. दोन्ही कलमांच्या शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. दंडाच्या रकमेपैकी पाच हजार रुपये पीडितेच्या कुटुंबाला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

Web Title: Crime Criminal Punishment Court