सांगली-मिरजेतील चार खासगी सावकारांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - टाकाळा येथील तेल व्यापारी उमेश बजाज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगलीतील चौघा खासगी सावकारांसह त्यांच्या साथीदारांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला. त्यात सचिन ढब्बू, भाऊसाहेब माळी, महेश शिंदे (सर्व रा. सांगली), निखिल महाबळ (रा. मिरज) यांचा समावेश आहे.

कोल्हापूर - टाकाळा येथील तेल व्यापारी उमेश बजाज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगलीतील चौघा खासगी सावकारांसह त्यांच्या साथीदारांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला. त्यात सचिन ढब्बू, भाऊसाहेब माळी, महेश शिंदे (सर्व रा. सांगली), निखिल महाबळ (रा. मिरज) यांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी  टाकाळा येथील श्रीनिवासा बिल्डिंगमध्ये बजाज कुटुंब राहते. त्यांचा सांगलीत तेलाचा व्यापार आहे. उमेश बजाज यांनी तीन ऑगस्टला घराच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यापूर्वी त्यांनी भावाच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. सावकारांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप बजाज कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणी आज दिलीप बजाज यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 
बजाज कुटुंबीयांचा तेलाचा व्यवसाय आहे. शाहूपुरीत एक तर सांगलीतील माधवनगर बुधगाव व मार्केट यार्ड अशी दोन दुकाने आहेत. माधवनगर येथील दुकान उमेश बजाज यांच्याकडे होते. त्यांनी व्यापारासाठी जानेवारी ते मार्च २०१७ या काळात सांगलीतील खासगी सावकार भाऊ माळीकडून ३३ लाख व महेश शिंदेकडून नऊ लाख रुपये पाच व सात टक्के व्याज दराने घेतले होते.

त्या रकमेपोटी आतापर्यंत त्यांनी माळीला २९ लाख ७५ हजार रुपये तर शिंदेला ७ लाख ६५ हजार रुपये आदा केले होते. तरीही त्या दोघांकडून वसुलीचा तगादा सुरू होता. त्यामुळे ते सांगलीत जाण्याचे टाळू लागले. मोबाईल बंद ठेवू लागले. याबाबत बजाज कुटुंबीयांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी रडून घडलेल्या गोष्टी घरच्यांच्या कानावर घातल्या होत्या.

पैशाच्या वसुलीसाठी माळी, शिंदे, निखिल महाबळ, सचिन ढब्बू, उमेश बजाज व त्यांच्या भावास जुलै ते २ ऑगस्टअखेर फोनवरून व दुकानात येऊन मानसिक त्रास देत होते. पोलिसांनी फिर्यादीनुसार ढब्बू, माळी, शिंदे तर मिरजेतील महाबळ व त्याच्या साथीदारांवर कलम ३०६, ५०४, ५०६, ३४, खासगी सावकारी अधिनियम २००४ कायदा कलम ३३, ३९, ४५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

कार्यालयात बोलावून धमकावले
दरम्यान, उमेश बजाज यांना ३० जुलैला सचिन ढब्बूच्या कार्यालयात बोलवून घेतले. तेथे सचिनसह माळी, शिंदे, निखिल व त्यांच्या आठ ते दहा साथीदारांनी पैशाची मागणी केली. पैसे देता येत नसतील तर तेलाची दुकाने, घर, आलिशान मोटार नावावर करून दे, नाहीतर तेलाची दुकाने कशी उघडताय ते बघतो, अशी धमकी दिली. मानसिक त्रासाला कंटाळून उमेश बजाज यांनी चिठ्ठी लिहून तीन ऑगस्टला टेरेसवर नायलॉन दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद दिलीप बजाज यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

Web Title: crime on Four private lenders of Sangli - Miraj