पोलिसांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

अपघातानंतर हुल्लडबाजांचे कृत्य; संभाजीनगरातील घटना, चौघांवर कारवाई
कोल्हापूर - संभाजीनगर चौकात आज सकाळी ट्रक आणि मोटारीच्या अपघातानंतर तरुणांनी हुल्लडबाजी केली. त्यामुळे गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. चौकातील सिग्नल चालू-बंद करत त्यांनी वाहतुकीची मोठी कोंडी केली. त्यांना रोखण्यास गेलेल्या पोलिसांना अरेरावीची भाषा वापरली.

अपघातानंतर हुल्लडबाजांचे कृत्य; संभाजीनगरातील घटना, चौघांवर कारवाई
कोल्हापूर - संभाजीनगर चौकात आज सकाळी ट्रक आणि मोटारीच्या अपघातानंतर तरुणांनी हुल्लडबाजी केली. त्यामुळे गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. चौकातील सिग्नल चालू-बंद करत त्यांनी वाहतुकीची मोठी कोंडी केली. त्यांना रोखण्यास गेलेल्या पोलिसांना अरेरावीची भाषा वापरली.

त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही या हुल्लडबाजांनी केला. त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही परिसरातील एका सांस्कृतिक कला-क्रीडा केंद्राच्या कर्मचाऱ्यानेही अरेरावीची भाषा वापरली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - संभाजीनगर पेट्रोल पंपानजीक सकाळी दहाच्या सुमारास ट्रक व मोटारीचा अपघात झाला. त्यातून दोन्ही वाहनचालकांत भररस्त्यात वाद सुरू झाला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. परिसरातील काही तरुण तेथे आले. त्यांनी ट्रकचालकाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्यास सुरवात केली. त्यातच त्यातील काही हुल्लडबाजांनी चौकातील सिग्नल चालू-बंद करण्यास सुरवात केली. त्यामुळे वाहनधारक गोंधळले. परिणामी वाहतुकीची कोंडी झाली.

तरुणांना समजाविण्याचा प्रयत्न एका वाहतूक पोलिसाने केला. त्याला यश आले नाही. त्यामुळे पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. घटनास्थळी शहर वाहतूक पोलिस व जुना राजवाडा पोलिस दाखल झाले. तोपर्यंत हा वाद हाणामारीपर्यंत पोचला. पोलिसांनी हुल्लडबाजांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील काहींनी थेट पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.

शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे हे थोड्या वेळात तेथे दाखल झाले. त्यांना पाहून हुल्लडबाजांनी पळ काढला. हे सर्वजण परिसरातील एका सांस्कृतिक कला-क्रीडा केंद्रात लपून बसले होते. ते तेथे असल्याचे काही नागरिकांनी राणे यांना सांगितले. तसे ते पथकासह त्या केंद्रात गेले. तेथील कर्मचाऱ्याने त्यांना अरेरावीची भाषा वापरली. राणे यांनी त्याला कडक भाषेत समज देत केंद्राची तपासणी केली. मात्र, तेथे त्यांना हुल्लडबाज मिळून आले नाहीत. थोड्या वेळातच जुना राजवाडा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. परिसरात काही काळ पोलिस बंदोबस्त तैनात होता.

सायंकाळी याप्रकरणी पोलिसांनी हणमंत गाडीवडर, विनायक केळवेकर, किरण लोंढे, दुर्गाप्पा कुऱ्हाडे या चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

सिग्नलला लॉक हवे...
हुल्लडबाजांनी संभाजीनगरातील सिग्नल चालू-बंद करण्याचा प्रताप केला. सिंग्नलला लॉक सिस्टीम नसेल तर त्याचा कोणीही कसाही वापर करू शकतो याचा अनुभव वाहतुकीच्या कोंडीत सापडलेल्या नागरिकांसह पोलिसांनीही घेतली. या अनुभवातून तरी शहाणे होऊन पोलिसांनी आता तरी सिंग्नलला लॉक लावावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: crime in kolhapur