
शहर पोलिसांनी आठ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सांगली : हरिश्चंद्र नारायण खेडेकर (वय ८२, रा. विनायक चौक, सेना मंदिर रोड, गावभाग, सांगली) यांनी रविवारी (ता. ७) सायंकाळी हरभट रस्त्यावरील सराफ दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी खेडेकर यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. चिठ्ठीत फसवणूक व सावकारी करून आर्थिक नुकसान व मानसिक त्रासातून आपण आत्महत्या केल्याचा उल्लेख केला आहे. त्यावरून शहर पोलिसांनी आठ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी माहिती दिली, की मधुकर कृष्णाजी खेडेकर (वय ७५, रा. नवभारत चौक, गावभाग, सांगली), श्रीकांत ऊर्फ बाळू विष्णुपंत खेडेकर (७०, रा. सिद्धार्थ परिसर, ढवळे तालीम मागे, सांगली), सदानंद विष्णुपंत खेडेकर (६०), प्रकाश विष्णुपंत खेडेकर (५५, दोघे रा. सांभारे गणपती शेजारी, गावभाग, सांगली), राजू शिरवटकर (५०, रा. नवभारत चौक, जैन बस्तीजवळ, गावभाग, सांगली), वैभव प्रमोद पिराळे (५०, रा. पिराळे ज्वेलर्स, सराफ कट्टा, सांगली), दिवाकर पोतदार (६०, रा. शेडबाळ, ता. कागवाड, जि. बेळगाव), सुनील पंडित (४२, रा. विटा) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी तेजस्विनी प्रशांत बेलवलकर (४३, रा. मुंबई) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयितांवर फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे, सावकारी कायदा ३९ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - लय भारी : सांगलीत १८ गावांत महिलाराज; २७ महिलांना थेट कामाची संधी
संशयितास पोलिस ठाण्यात भोवळ
सराफ आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल झालेल्या संशयितांना चौकशीसाठी ठाण्यात बोलावले होते. यावेळी चौकशी सुरू असताना एका संशयितास ठाण्यातच भोवळ आली. तो खाली पडला. त्यास तातडीने रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संपादन - स्नेहल कदम