#SolapurCrime : पुन्हा इथे आलात तर जिवंत ठेवणार नाही..!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

ही जागा आमची असून पुन्हा जागेवर यायचं नाही, तुम्हाला जागा परत पाहिजे असल्यास 25 लाख रुपये द्या, या जागेवर दुसऱ्यांदा आलात तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सोलापूर : जागेवर अतिक्रमण करून वृद्धाला आणि त्याच्या मुलाला 25 लाख रुपयांची मागणी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा : संचालक ओळखीचे आहेत, अनेकांना नोकरी लावलीय! 

जागा परत पाहिजे असल्यास 25 लाख रुपये द्या
नागनाथ मनोहर गायकवाड, नागेश दत्तू गायकवाड, शिवाजी संभाजी टाकळीकर, सिद्धाराम भीमाशंकर वाघमारे यांच्यासह अन्य आठ साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. मल्लिकार्जुन चनबसप्पा मळसिद्धनवर (वय 75, रा. नीलमनगर, एमआयडीसी, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 17 जानेवारी 2019ला जय जलारामनगर परिसरात घडली. फिर्यादी मल्लिकार्जुन मळसिद्धनवर आणि त्यांच्या मुलाच्या जागेवर आरोपींनी अतिक्रमण केले आहे. आमच्या जागेवर पत्राशेड मारून कब्जा का केला, ही जागा आम्ही खरेदी केली आहे असे मळसिद्धनवर यांनी आरोपींना सांगितले. त्यावर आरोपींनी काठ्या, लोखंडी गज घेऊन येत ही जागा आमची असून पुन्हा जागेवर यायचं नाही, तुम्हाला जागा परत पाहिजे असल्यास 25 लाख रुपये द्या, या जागेवर दुसऱ्यांदा आलात तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

हेही वाचा : अन्‌ वकिलाने वाढदिवसाला घेतलेली सायकल काढली बाहेर!

अल्पवयीन चोरट्यासह दोघांना अटक 
फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन चोरट्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून साडेतेरा तोळे सोन्यासह दोन लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेला चोरटा मरिआई चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डोणगाव रोड येथे सापळा लावण्यात आला होता. तिथे आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने एका साथीदारसोबत फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसा आणि रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील साडेतेरा तोळे सोने एकूण दोन लाख 92 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने वाइन शॉप येथे चोरी करणाऱ्या संशयित बाळू निवृत्ती गुरवे (वय 50, रा. बालाजीनगर, कुमठे तांडा, सोलापूर) यास अटक केली आहे.

हेही वाचा : वणवा.. वनासोबतच वन्यजीवांना धोकादायक!

मुलगी घरातून निघून गेल्याने आईची आत्महत्या 
सोलापूर : मुलगी घरातून निघून गेल्याच्या कारणावरून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. कस्तुरा नामदेव कटकधोंड (वय 55, रा. लोखंडवाला रेसिडेन्सी, विजयपूर रोड, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या पूर्वी घडली. मुलगी अंजली ही घरातून निघून गेल्याच्या कारणावरून कस्तुरा यांनी घरी साडीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतला. बेशुद्धावस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात झाली आहे. 

मारहाणीनंतर जखमी वृद्धाचा मृत्यू 
सोलापूर : मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महादेव धर्मण्णा रोट्टे (वय 75, रा. देसाईनगर, सोलापूर) असे मृताचे नाव आहे. घरी दारूच्या नशेत पैसे न दिल्याच्या कारणावरून मंगळवारी आंबण्णा ऊर्फ धर्मराज रोट्टे याने महादेव यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली होती. या घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांना मुलगा गुरुशांत यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news at solapur