माणूस पारखीतून उलगडला दरोडा

हेमंत पवार
बुधवार, 20 मार्च 2019

कऱ्हाड - सीसीटीव्हीची नजर पोचत नाही अशा गुन्ह्यात पोलिसांचे कसब पणाला लागते. शेणोलीतील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या दरोड्यात तसेच झाले. तपासातील पूर्वानुभव, माणसे ओळखण्याची कला याद्वारे दरोड्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले. माणसे हेरून ती ओळखण्याची किमया त्यांनी साधल्यानेच या दरोड्यातील ‘मास्टर माइंड’ला पकडण्यात यश मिळाले. त्याला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयाचीही किनार आहे. 

कऱ्हाड - सीसीटीव्हीची नजर पोचत नाही अशा गुन्ह्यात पोलिसांचे कसब पणाला लागते. शेणोलीतील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या दरोड्यात तसेच झाले. तपासातील पूर्वानुभव, माणसे ओळखण्याची कला याद्वारे दरोड्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले. माणसे हेरून ती ओळखण्याची किमया त्यांनी साधल्यानेच या दरोड्यातील ‘मास्टर माइंड’ला पकडण्यात यश मिळाले. त्याला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयाचीही किनार आहे. 

महाबॅंकेच्या शेणोली शाखेवर सोमवारी (ता. ११) भरदुपारी गोळीबार करत संबंधित संशयितांनी दरोडा टाकून रोकड व सोने असा सुमारे ३२ लाखांचा ऐवज लंपास केला. या तपासाचे आव्हानच पोलिसांपुढे होते. या किचकट गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत माळी, अमित पवार, सज्जन जगताप, शशिकांत काळे, शशिकांत घाडगे यांच्या पथकाने पारे (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे दत्तात्रय मधुकर जाधव या संशयिताच्या घरावर छापा मारला. त्याठिकाणी दरोड्याच्या कटाचा सूत्रधार व दरोड्याच्या आणखी दोन गुन्ह्यांत फरारी असलेला किरण गायकवाडही सापडला. दरोड्याचा ‘मास्टर माईंड‘ असूनही वेशांतर करून, बनावट कागदपत्रे तयार करून स्वतःचे नाव आणि ओळख लपवून किरण गायकवाड हा वावरत होता. तशी बनावट नावाची कागदपत्रेही त्याने तयार केली होती. त्यामुळे त्याने यापूर्वी तपासात पोलिसांना हुलकावणीही दिली होती.

त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो उडावउडवीची उत्तरे देत होता. मात्र, तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अमित पवार यांना त्याचा संशय आला. त्यांना माणसांची पारख असल्यामुळे त्यांनी त्यांच्या स्टाइलने त्याच्याकडे चौकशी करत पोलिस खाक्‍या दाखवताच त्याने किरण शिवाजी गायकवाड (रा. नेर्ली) असे नाव असल्याचे सांगितल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. त्यानंतर त्याने शेणोलीतील दरोड्याची कबुली दिली. तेथूनच पुढे त्याच्याबरोबर असणाऱ्या साथीदारांची माहिती मिळाल्याने तो दरोडा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तपासामध्ये पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक ढवळे, तालुका पोलिस निरीक्षक क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समन्वयही मोलाचा ठरला. त्यामुळेच केवळ चारच दिवसांत या दरोड्याचा तपास लावण्यात यश आले.

‘मास्टरमाइंड’चा दोन वर्षांनी शोध 
कऱ्हाड तालुका व कडेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोल पंपावर गोळीबार करत टाकलेल्या सशस्त्र दरोड्यामध्ये परप्रांतीयांना सोबत घेऊन गुन्हा केलेला व फरारी असलेला मुख्य संशयित आणि शेणोलीतील महाबॅंकेवरील दरोड्याच्या गुन्ह्यातील ‘मास्टरमाइंड’ किरण गायकवाड हा सन २०१७ पासून फरारी होता. त्याला तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने दोन वर्षांनंतर ताब्यात घेतल्याने आता त्याही गुन्ह्यांचा उलगडा होईल.

Web Title: Crime Police Criminal Arrested