सांगलीत गुंडाचा निर्घृण खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

सांगली - रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश बसाप्पा माळगे (वय 28, रा. त्रिमूर्ती कॉलनी) याचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून झाला. हनुमाननगरमधील चौथ्या गल्लीत आज (मंगळवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास कोयत्याने वार केले. याप्रकरणी माजी नगरसेवक राजू गवळी यांचा भाचा धनंजय गवळी याच्यासह सात जणांवर पोलिसांचा संशय आहे. दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

सांगली - रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश बसाप्पा माळगे (वय 28, रा. त्रिमूर्ती कॉलनी) याचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून झाला. हनुमाननगरमधील चौथ्या गल्लीत आज (मंगळवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास कोयत्याने वार केले. याप्रकरणी माजी नगरसेवक राजू गवळी यांचा भाचा धनंजय गवळी याच्यासह सात जणांवर पोलिसांचा संशय आहे. दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की गणेश माळगे हा खुनी हल्ल्यातील गुन्हेगार आहे. त्याची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली होती. गणेश आणि हल्लेखोर धनंजय यांच्यात पूर्वीपासून वाद होता. गणेश आज सायंकाळी पाच वाजता गवळी याच्या घरी दुचाकी (एमएच 10 सीके 3585)वरून गेला होता. त्यावेळी गणेशसोबत ओंकार पाटील आणि प्रथमेश कदम हे मित्र होते. गवळी याच्या घरी गेल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी धनंजयसह सात जणांनी गणेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद टोकाला गेल्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत गणेश धावत सुटला. त्यावेळी हनुमाननगरच्या चौकात तो पडला. त्यावेळीही त्याच्यावर वार करण्यात आले. डोक्‍यावर, हातावर गंभीर इजा झाल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, गणेशला शासकीय रुग्णालयात नेले, त्यावेळी डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. त्यावेळी हनुमाननगर परिसरातील नागरिकांची गर्दी होती. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. 

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे, उपाधीक्षक अशोक वीरकर यांच्यासह पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. 

राजू गवळी ताब्यात 
खुनानंतर रात्री उशिरा माजी नगरसेवक राजू गवळी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी धनंजय गवळीसह सात जणांचा समावेश असल्याची माहिती उपाधीक्षक वीरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

हनुमाननगरला छावणी... 
हनुमाननगर परिसरात खून झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. संवेदनशील परिसर असल्याने सायंकाळी पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. 

कोण हा गणेश माळगे? 
गणेश माळगे हा त्रिमूर्ती कॉलनीत पत्नी, दोन मुलांसह राहात होता. यापूर्वी खुनी हल्ल्याचा गुन्हा त्याच्यावर होता. त्याचा नुकताच जामीन झाला होता. धनंजयशी असणारा त्याचा वादा साऱ्या हनुमाननगर परिसरात माहीत होता. 

Web Title: Criminal murder in sangli