Sangli News : 'ज्या' वक्तव्यावरून वाद सुरू आहे तीच वक्तव्ये जर CM, PM वर झाली असती तर, लगेच अटक झाली असती - भारत पाटणकर

बीआरएसचे नेते,तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने वाटेगावला येणार
Sangli News : 'ज्या' वक्तव्यावरून वाद सुरू आहे तीच वक्तव्ये जर CM, PM वर झाली असती तर, लगेच अटक झाली असती - भारत पाटणकर

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : महात्मा गांधी यांच्या नावाने झालेली टीका जर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांच्यावर वैयक्तिक पातळीवर झाली असती तर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली असती, त्यासाठी गुन्हा दाखल होण्याचीही वाट पाहावी लागली नसती अशा भाषेत श्रमिक मुक्ती दलाचे नेते व ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी आज येथे मनोहर भिडे यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली.

वाटेगाव (ता. वाळवा) येथे २० ऑगस्टला होणाऱ्या शाहिरी लोककला संमेलनाच्या अनुषंगाने आज इस्लामपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. भारत पाटणकर म्हणाले, "सध्या ज्या वक्तव्यावरून वाद सुरू आहे तीच वक्तव्ये जरएखाद्या जिवंत उच्चपदस्थ व्यक्तींच्या बाबतीत झाली असती तर संबंधित व्यक्तीला लगेच अटक झाली असती.

त्यासाठी कुणीतरी केस घालावी लागली असती, असे वाटत नाही. महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अलीकडे अत्यंत गलिच्छ शब्दात वक्तव्ये झाली आहेत. देशात हे अलीकडे राजरोसपणे सुरू आहे.

इतका बधिरपणा आज निर्माण झाला आहे. हा बधिरपणा घालवण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्नांची गरज आहे. वेगवेगळ्या चळवळींना सक्रिय करून त्यांच्या माध्यमातून लोककलेला महत्त्व देण्याची वेळ आली आहे. येत्या २० ऑगस्टला वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकशाहीर अमर शेख यांच्या पुण्यतिथीनिमित्त या तिघांचाही वारसा पुढे नेण्याच्या हेतूने शाहिरी लोककला संमेलनाचे आयोजन केले आहे.

विविध क्षेत्रातील लोककलावंत मान्यवर यात सहभागी होतील. देशातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. मताच्या राजकारणापलीकडे जयंती पुण्यतिथीकडे कोणी पाहत नाही. फुले-शाहू-आंबेडकर, गौतम बुद्ध आणि मार्क्स यांच्या वैचारिक परंपरांचे प्रतीक म्हणून आम्ही हे संमेलन घेत आहोत.

ही फक्त करमणुकीची गोष्ट नाही तर स्फूर्ती देणारी गोष्ट असेल. लोककला नेहमीच प्रबोधन करत आलेली आहे." प्रा. सचिन गरुड म्हणाले, "देशात सर्वत्र फॅसीझमचे वातावरण आहे. यात पश्चिम महाराष्ट्र टार्गेट करण्यात आल्याचे दिसते.

कर्नाटकात जो राजकीय बदल झाला त्याचे मुख्य कारण सांस्कृतिक आहे. कर्नाटकात झालेल्या सांस्कृतिक बदलांचा प्रभाव तिथल्या राजकारणावर पडला आहे. महाराष्ट्रात साहित्य, संस्कृती, कलेच्या क्षेत्रात सध्या काही विशेष घडताना दिसत नाही. कलाकार बोलत नाहीत. त्यासाठी एक नवा पांडा आम्ही या संमेलनाच्या माध्यमातून पाडण्याचा प्रयत्न करत आहोत." वाळवा पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र बर्डे, जयंत निकम यावेळी उपस्थित होते.

बीआरएसचे नेते,तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने वाटेगावला येणार आहेत. त्यांना इथली फारशी माहिती असण्याचे कारण नाही. त्यांना अण्णाभाऊ साठे यंच्याविषयी खूप माहिती द्यावी लागली असेल, मगच ते यायला तयार झाले असावेत. मतांच्या राजकारणापालिकडे याकडे आज कुणी पाहत नाही, असेही डॉ. पाटणकर यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com