माैजे डिग्रज येथील बारा वर्षाच्या मुलाला मगरीने नेले ओढून

बाळासाहेब गणे
शुक्रवार, 17 मे 2019

एक नजर

  • माैजे डिग्रज (ता. मिरज) येथे बारा वर्षाच्या मुलाला मगरीने नेले ओढून. 
  • आज दुपारी दोनच्या सुमारास घटना
  • आकाश मारुती जाधव (१२, रा. निंबळक ता. विंडी जि. विजापुर) असे मुलाचे नाव.

तुंग - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात पोहणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या चिमुरड्यास मगरीने ओढून नेले. आज दुपारी बाराच्या सुमारास आकाश मारुती जाधव (वय १२, मूळ गाव रा. निंबळक, ता. इंडी, जि. विजापूर) हा पाण्यात खेळत असताना हिंस्र मगरीने त्याला त्याच्या आईसमोरच  पाण्यात ओढून नेले. स्थानिक ग्रामस्थांनी आरडाओरडा केला. मगर काही काळ आकाशला पाण्यातून ओढत नेत असताना लोकांनी पाहिले. बाळासाहेब लांडे यांच्या वीटभट्टीजवळ ही घटना घडली. 

काही वेळातच जीवरक्षक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी वनविभागाच्या पथकासह शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी मगर पाण्यात फेऱ्या मारत होती. सायंकाळपर्यंत शोध मोहीम सुरू होती. दरम्यान मगरीच्या हल्ल्याने कृष्णाकाठी पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.  काही दिवसांपूर्वी सांगलीतील आयर्विन पुलाजवळ  मगरीचे दर्शन झाले होते. 

याबाबतची अधिक माहिती अशी - आकाश बहीण आईसोबत नदीकाठी आला होता. आई पाण्यात धुणे धूत  असताना आकाश शेजारीच डुबक्‍या मारत होता.  अचानक मगरीने हल्ला करताच आईने आरडाओरडा केला. तिच्यासमोरच आकाशला मगरीने पाण्यात ओढून नेले. नदीकाठावरील लोक धावले. त्यावेळी मगर आकाशला गतीने ओढून नेत होती. सुन्नपणे पाहणे एवढेच जमावाच्या हाती उरले होते.

वनविभागाला तत्काळ संपर्क केल्यानंतर वनक्षेत्रपाल मनोज कोळी टीमसह आले. त्यांनी बोटीतून परिसरात शोध सुरू केला. त्या दरम्यान त्यांना दोन ते तीन वेळा फक्त भल्या मोठ्या मगरीचेच दर्शन झाले.  

आकाशचे आई-वडील गेल्या वर्षापासून मौजे डिग्रज येथील अनिल पाटील यांच्या वीटभट्टीवर कामाला आहेत. ते दोन मुलीसह येथे रहायचे. हा चार दिवसांपूर्वीच आकाश सुटीमुळे इकडे आला होता. जाधव कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. परिसरातील वीटभट्टी मजूर- ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत होते.

डोळ्यासमोरच मूल गेले
गेल्या वर्षी २० एप्रिलला ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथील मुलाला मगरीने ओढून नेले होते. मामाकडे सुटीला आलेल्या हारुगिरी (कर्नाटक) येथील सागर सिदु डंक (वय १४) या मुलावरील त्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा  हा प्रकार घडला. आजही आकाश आई व बहिणीसोबत हट्टाने आला आणि सर्वांच्या डोळ्यादेखत त्याला मगरीने ओढून नेले. 

निर्जन नदीपात्रात वावर नकोच
निर्जन परिसरात मगरी अंडी घालतात. अंडी घातलेल्या परिसरात कुणाचाही वावर त्यांना खपत नाही. या काळात त्या हिंस्त्र होतात. यापूर्वीचे हल्ल्याचे प्रकारही निर्जन स्थळी झाले आहेत. पाणवठे सोडून अन्यत्र निर्जन नदीपात्रातील वावर कटाक्षाने टाळा असे आवाहन वनक्षेत्रपाल मनोज कोळी यांनी केले आहे. ते म्हणाले,‘‘जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल.’’

पंधरा वर्षांत नऊ बळी
सन २००३ ते २०१८ पर्यंत मगरीच्या हल्ल्यात नऊ जणांचा दुर्दैवी बळी गेला, तर बारा जण जखमी झाले. मृतांची नावे- अनिकेत राजाराम कदम (कदमवस्ती, कसबे डिग्रज), रामचंद्र भिकू नलवडे (साखरवाडी), सुनील पांडुरंग भोसले (अंकलखोप),  वर्षा विनोद कांबळे (ब्रह्मनाळ), वसंत मोरे (भिलवडी), अजय शिवाजी यादव (चोपडेवाडी), रामेश्‍वर ज्ञानेश्‍वर राठोड (नागठाणे), संजय गंगाराम भानूसे (तुंग), सागर डंग (बह्मनाळ), जखमी- नाथा भीमाण्णा बागडी (तुंग), बालेखान यासीन शेख (सांगली), उमेश केशव घाडगे (कसबे डिग्रज), बाळू पठाण (नागराळे), अशोक सोनाप्पा नलवडे (भिलवडी), यशवंत श्रीपती पाटील (मांगले), भोलानाथ मारुती गोसावी (कांदे), महादेव केशव यादव (धनगाव), रामचंद्र नाना कांबळे (भिलवडी), सुनीला बाळासाहेब मोहिते (धनगाव), तानाजी केरू कांबळे (भिलवडी), रत्नाप्पा नायकू यादव (चोपडेवाडी) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crocodile drag 12 years child in Krishna River

टॅग्स