हमिदवाडात विहिरीतील मगर जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

म्हाकवे - हमिदवाडा (ता. कागल) येथे दोन महिन्यांपासून वारंवार नजरेस पडणाऱ्या मगरीला वन विभाग व हळदीतील सर्पमित्रांच्या अथक प्रयत्नांतून जेरबंद करण्यात यश आले. गावाच्या दक्षिण बाजूला वारंवार दिसणाऱ्या या मगरीमुळे शेतकरी व वाडीवस्तीवरील ग्रामस्थ भयभीत झाले होते.  

म्हाकवे - हमिदवाडा (ता. कागल) येथे दोन महिन्यांपासून वारंवार नजरेस पडणाऱ्या मगरीला वन विभाग व हळदीतील सर्पमित्रांच्या अथक प्रयत्नांतून जेरबंद करण्यात यश आले. गावाच्या दक्षिण बाजूला वारंवार दिसणाऱ्या या मगरीमुळे शेतकरी व वाडीवस्तीवरील ग्रामस्थ भयभीत झाले होते.  

दोन महिन्यांपूर्वी हमिदवाडा-मेतके रस्त्यावर नवनाथ चोपडे यांच्या विहिरीमध्ये ही मगर आठ ते दहा दिवस होती. त्या वेळी अनेकांना या मगरीचे दर्शन झाले होते. हा परिसर चिकोत्रा नदीच्या काठावरच येतो. ही मगर रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावरून इकडे तिकडे जाताना काही नागरिकांना तसेच ऊस वाहतूक करणाऱ्यांना नजरेस पडली होती. दोन दिवसांपूर्वी विठ्ठल भोसले हे सकाळी विद्युत पंप सुरू करण्यास गेले असता त्यांना मगर दिसली होती. त्यामुळे शेतकरी तसेच सरपंच धोंडिराम कोंडेकर, पोलिसपाटील सुहास कुंभार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या. दोन दिवसांपूर्वी मगर विष्णू मोरे यांच्या विहिरीत पाहिल्याने या विहिरीतील पाणी उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला. वन विभागाचे अधिकारी व हळदी येथील सर्पमित्रांनी अथक परिश्रमातून या मगरीला जेरबंद केले. 

या वेळी वन विभागाचे महेश पाटील, एस. बी. पटकरे, दत्तात्रय टिकले, शंकर शेटके आदी उपस्थित होते.

मादी जातीची मगर
मादी जातीच्या या मगरीची लांबी ६ फूट, वजन ४० किलो, तर वय अंदाजे ६ ते ७ वर्षे इतके आहे. या मगरीला पकडण्यासाठी शेतकऱ्यांसह हमिदवाड्यातील तरुणांनीही सहकार्य केले.

सर्पमित्रांचे धाडस
आजअखेर हजारहून अधिक सापांना जीवदान देणाऱ्या हळदी (ता. कागल) येथील संदीप मोहिते, दयानंद टेंबुगडे, नामदेव तिकोडे या सर्पमित्रांनी प्रथमच मगर पकडली. मगरीला कोणतीही इजा न होता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी तिला पकडले.

Web Title: crocodile martingale