त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरात मोठी गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

- स्वामी नामाचा जयघोष

- 11.30 वाजता स्वामींची नैवेद्य आरती

-  देवस्थान समितीने चोख व्यवस्था केली

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी नामाचा जयघोष करीत असंख्य पालख्या, दिंड्यांसह 
सुमारे एक लाख स्वामी भक्तांनी मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. 
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर, समाधी मठ फुलांनी 
व विद्युतरोषणाईने सुशोभित करण्यात आलेला होता. 
आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात स्वामींच्या 
दर्शनाकरिता भक्तांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पाच वाजता स्वामींची 
काकडआरती मंदिराचे पुरोहित मोहन गुरुजी, मंदार महाराज, व्यंकटेश महाराज 
यांनी केली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे उपस्थित होते. 
स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे वटवृक्ष मंदिरातील नित्याभिषेक 
आज बंद ठेवण्यात आले होते. 11.30 वाजता स्वामींची नैवेद्य आरती 
झाल्यानंतर गाभाऱ्याशेजारील मंडपात सर्व स्वामीभक्तांना शिऱ्याचा प्रसाद 
देण्यात आला. पहाटे काकड आरतीनंतर भक्तांना दर्शनास दक्षिणद्वारातून 
सोडण्यात आले. पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिराच्या बाहेर लांब रांगा 
लागलेल्या होत्या. मोठी गर्दी पाहून भक्तांना रांगेत व टप्प्याटप्प्याने 
दर्शन कक्षातून दर्शनास सोडण्यात येत होते. 
आज पुणे, दौंड, मालेगाव, मसलेचौधरी, बार्शी, सोलापूर, कर्जत, 
भोर, खर्डी-पंढरपूर, कुमठा सोलापूर, उस्मानाबाद, मुंबई, फलटण, जेजुरी, 
नागपूर, धुळे, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, अकोला, रत्नागिरी आदी 
ठिकाणांहून दिंड्या व पालख्यांसोबत पायी चालत येऊन गुरुरूपी स्वामींच्या 
चरणी स्वामीभक्त नतमस्तक होत होते. वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात 
भक्तांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी देवस्थान समितीने चोख व्यवस्था केली होती.
पालखी व दिंडीत येणाऱ्या भक्तांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या
वतीने देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे 
सालाबादप्रमाणे भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. 
वटवृक्ष मंदिर गाभारा, गणेश मंदिर, शेजघर, वटवृक्ष मंदिर परिसर आदी 
भागात फुलांनी सजावट करण्यात आली होती. ही सजावट पुणे येथील 
स्वामीभक्त अप्पा वायकर यांनी केली होती. 
श्री स्वामी समर्थ समाधी मठ फुलांनी सुशोभित 
करण्यात आला होता. मंदिर गाभारा, गाभाऱ्यासमोरील 
भाग फुलांनी सजविण्यात आली होती. तसेच श्री राजेराय मठ येथेही 
त्रिपुरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
श्री गुरु मंदिर येथेसुद्धा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. 
महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds gathered at Shri Swami Samarth Vatraksh Mandir on the occasion of Tripuri