आदिवासी लोकवाद्ये सूरमयी वाद्यांचा नजराणा 

शिवाजी यादव
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

वीर नरमद साउथ गुजराथी युनिव्हर्सिटीच्या डॉ. पारूल देसाई या विद्यार्थ्यांचे नृत्यपथक घेऊन महोत्सवाला आल्या आहेत. हे पथक आदिवासी पारंपरिक लोकनृत्य सादर करणार आहे. डॉ. देसाई यांनी या वाद्याला संशोधनातून शास्त्रीय जोड दिली आहे.

कोल्हापूर - सध्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स तंत्राच्या वाद्यांची चलती आहे. त्यातील ध्वनीलहरी नक्कीच ताल धरायला लावतात. तसा ताल-सूर भारतीय लोकसंगीतातील देशी बनावटीच्या वाद्यातून उमटतो. त्यातील ध्वनी लहरी मनाला प्रसन्नतेचा साज देतात.

त्यासोबत मनातील भीती दूर करून जोश निर्माण करतात. अशा वाद्यातील सूर, ताल, लय एखाद्या संकटातील ताण, ओझे हलका करण्याची किमया साधते, अशी वाद्ये आदिवासी संस्कृतीची शान बनली आहेत. अशी लोकवाद्ये शिवाजी विद्यापीठात भरलेल्या शिवोत्सव 2017 मध्ये आदिवासी नृत्यासाठी आणली आहेत. त्या वाद्यांची शास्त्रीय गुणवैशिष्ट्ये भारतीय संगीतातील सुरेलतेच्या छटा अधोरेखित करीत आहेत. 

वीर नरमद साउथ गुजराथी युनिव्हर्सिटीच्या डॉ. पारूल देसाई या विद्यार्थ्यांचे नृत्यपथक घेऊन महोत्सवाला आल्या आहेत. हे पथक आदिवासी पारंपरिक लोकनृत्य सादर करणार आहे. डॉ. देसाई यांनी या वाद्याला संशोधनातून शास्त्रीय जोड दिली आहे. त्यांची रंगीत तालीम सुरू असताना या वाद्याची झलक अनुभवता आली. 

तडफा ः हे प्रमुख सूरवाद्य आहे. मराठी पुंगी किंवा गारूड याच्याशी साधर्म्य साधणारे तडफा हे वाद्य आहे. काळीपट्टीच्या चारच्यावरील सूर आहे. त्याचा पेहराव आदिवासी संस्कृतीचा आहे. वाळलेल्या फुलांचे बोंड, तुरे व रंगीबेरंगी दोरे या वाद्याच्या डोईवर डोलतात. त्याखाली दोन वाळलेल्या दुधी भोपळ्याचे आकार आहेत. त्याला मध्यभागी बांबूच्या पोकळ कांड्या जोडल्या आहेत. प्रत्येक कांड्याला तीन- चार छिद्रे आहेत. भोपळ्याच्या पोकळीच्या तोंडावर पोकळ बांबूची कांडी आहे. त्याच्या टोकावर फुंकर मारल्यानंतर हवा भोपळ्याच्या दोन्ही आकारात घुमते. तिथे ध्वनितरंग निर्माण होऊन एका लयीत बांबूच्या पोकळीतील छिद्रातून बाहेर पडतात तेव्हा सूरमयी व काहीशा खर्जातील ध्वनिलहरी उमटतात. फुंकर मारण्यासोबत निर्माण होणारा नादब्रह्म जोश निर्माण करतो. वेस्टर्न वाद्यामध्ये सॅक्‍सोफोनच्या सुरावटींशी बरोबरी करणारे; पण सुरेल असे तडफा हे वाद्य आहे. 

संबाला ः मराठी संबळ या वाद्याशी मिळते जुळते असे संबाल हे ताल वाद्य आहे. संबळ व संबाला यात तुलनात्मक फरक आहे. संबालात दोन डग्गे आहेत. एकावर चमडे, तर दुसऱ्यावर पॉलिव्हिनेल (प्लास्टिक) पेपरसारखे आवरण आहे. त्यावर गोलाकार काटीने आघात केल्यास खणखणीत, दमदार ध्वनी उमटतात. हे वाद्य रणवाद्य म्हणून परिचित आहे. एखाद्या कठीण प्रसंगाला सोमोरे जाताना मनातील भीती दूर होऊन जोश निर्माण करणारा काहीसा कर्कश आवाज करणारे कडकडाट करणारे वाद्य आहे; पण संबळ वाद्याच्या तुलनेत संबालाचा आवाज काहीसा खालच्या पट्टीत आहे. 

पेपुडी ः हे वाद्य महाराष्ट्रातील यात्रा- जत्रांमध्ये वाजविल्या जाणाऱ्या पिपाणीच्या भगिनी म्हणजे पिपुडी. वेताच्या पोकळ कांड्या आहेत. त्याच्या शेवटी ध्वनी घुमण्यासाठी गोलाकार चंद्रकोर आकार हा विशिष्ट झाडाच्या साली किंवा पानांपासून बनविलेला आहे; तर सुरवातीच्या टोकाला झाडांच्या साली किंवा पानांपासून बनविलेले चपटे तोंड आहे. त्यावर फुंकर मारल्यानंतर सूर तयार होतात. 

Web Title: cultural festival in shivaji university