ग्रामीण जनतेला बसतोय नोटाबंदीचा फटका

जालिंदर सत्रे 
रविवार, 8 जानेवारी 2017

पाटण तालुक्यात जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये दिवसभर रांगेत उभे राहून मिळतात ५०० रुपये
पाटण - शासनाच्या नोटाबंदीचा खरा फटका ग्रामीण जनतेला बसत आहे. हातात चलन नसल्याने नोकरदारांबरोबर शेतकरी दिवसभर रांगेत उभे राहत आहेत. दिवसभर रांगेत उभे राहून हातात फक्त ५०० रुपये मिळत असल्याने संसार व शेतीचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप सरकारने ‘अच्छे दिन’ नाही दाखविले तरी चालेल; पण ५०० रुपये देऊन चालवलेली थट्टा थांबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

पाटण तालुक्‍यासारख्या ग्रामीण भागात जनतेला नोटाबंदीचा सामना करावा लागत आहे. ढेबेवाडी, कोयनानगर, मल्हारपेठ, मारुल- हवेली, चाफळ व पाटण या बाजारपेठा सोडल्या तर इतर गावांत राष्ट्रीयीकृत बॅंका नाहीत. शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीसांची बॅंक खाती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेत आहेत. शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार विकास सोसायट्यांमुळे जिल्हा बॅंकेशी निगडित आहेत. ९० टक्के जनता जिल्हा बॅंकेवर अवलंबून असल्याने हा आतबट्ट्याचा खेळ सामान्य जनतेला उपाशी ठेवणार असे चित्र आहे.

जिल्हा बॅंकेच्या शाखांना शासन अपुरा पतपुरवठा करीत असल्याने जनतेला दिवसभर रांगेत उभे राहून एक जानेवारी अगोदर २०० रुपये मिळत होते. आता फक्त ३०० रुपयांची वाढ होऊन ५०० रुपये मिळतात. त्यामुळे जिल्हा बॅंकेत खाते असणे गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत आहे. शासकीय सेवा बजावायची, की रांगेत उभे राहून २०० रुपये मिळवायचे, या दुहेरी संकटात शासकीय कर्मचारी असून, संसार चालविणे जिकिरीचे झाले आहे. 

शेतकऱ्याची अवस्था तर सांगायला नको. शेतातील मजुरांना पैसे वेळेवर देता येत नाहीत. त्याचा शेतीच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे तो वेगळाच. दोन हजार मिळाले, तर सुट्याचा वांदा व मजुरांची कमतरता असताना शेतातील काम सोडून २०० व ५०० रुपयांसाठी रांगेत उभे राहून देशभक्ती सिद्ध करावी लागत आहे. मिळणाऱ्या २०० व ५०० रुपयात मजुरांना किती व स्वतःच्या संसाराला किता वापरायचे अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी वाटचाल करीत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदींनी आम्हाला अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. अच्छे दिन कधी येतील यावर आता जनतेचा विश्वास राहिला नसून तुमचे अच्छे दिन नको; पण दिवसभर रांगेत उभे राहिल्यानंतर दिली जाणारी ५०० रुपयांची भिख देऊन थट्टा तरी करू नका, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी देत आहे.

Web Title: currency ban hit rural public